VHP on Hindu Population : भारतात बहुसंख्य असलेल्या आणि प्रमुख धर्म असलेल्या हिंदूंच्या लोकसंख्येत घसरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये शुक्रवारी (दि.७) विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय उमेदवार मंडळाच्या बैठकीच्या दुसऱ्या सत्रात, एक ठराव मंजूर करण्यात आला.
यामध्ये हिंदूंची घटती लोकसंख्या, कुटुंबांचे विघटन, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाची वाढती प्रवृत्ती, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, या समस्या हिंदू समाजासाठी एक मोठे आव्हान बनल्या असून याचे उत्तर तरुण पिढीला द्यावे लागणार आहे, असे सांगण्यात आले.
विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले की, हिंदू युवा शक्तीने नेहमीच देशासमोरील प्रत्येक समस्या आणि आव्हानांना प्रतिसाद दिला आहे. हिंदू समाजाच्या लोकसंख्येचे संतुलन सतत बिघडत आहे, हे समाजासाठी घातक ठरू शकते. हिंदू ही भारताची ओळख आहे आणि जर हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तर देशावर संकटाचे ढग येतील. तसेच, अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी हिंदू तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे.
पुढे सुरेंद्र जैन म्हणाले की, लग्नाला होणारा विलंब आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या भ्रामक संकल्पनांमुळे हिंदू जोडप्यांमध्ये मुलं जन्माला घालण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे हिंदू तरुणांनी वयाच्या २५ व्या वर्षी लग्न करावे, ही आजची गरज आहे. तसेच, पाश्चात्य भौतिकवाद, शहरी नक्षलवादी कट आणि जागतिक कॉर्पोरेट एंटरटेनमेंटच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणाई गोंधळून जात आहे. ज्यामुळे लिव्ह-इन रिलेशनशिप वाढत आहेत.
दरम्यान, या ठरावाद्वारे विश्व हिंदू परिषदेने आनंदी कौटुंबीक जीवन सुनिश्चित करण्यासाठी, तसेच मुलांना आणि वृद्धांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपल्या संस्कृतीकडे परतण्याचे तरुणांना आवाहन केले. दुसरीकडे, सुरेंद्र जैन यांनीही देशातील वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली. देशभरातील १६ कोटींहून अधिक लोकांचे अंमली पदार्थांचे व्यसन हे अशा समस्यांचे मूळ कारण असल्याचे सुरेंद्र जैन यांनी सांगितले.