पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि एचएएम (हिंदुस्तानी आवाम मोर्चा) पक्षाचे प्रमुख जीतनराम मांझी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. प्रभू श्रीराम हे काल्पनिक व्यक्तीमत्व असल्याचं यापूर्वी मांझी यांनी म्हटलं होत. आता, पुन्हा एकदा मांझींनी हिंदू धर्माबाबत वादग्रस्त विधान केलं असून ब्राह्मण समाजाबद्दलही अपशब्द वापरले आहेत. हिंदू धर्म खराब असल्याचे सांगत सत्यनारायणाच्या पूजेवरही त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
मांझी यांनी एका कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्म आणि सत्यनारायण पूजासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, ट्विटरवरुन त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पाटणा येथील मुसर भुइया समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलतानाचा त्यांचा हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये, आता प्रत्येक ठिकाणी आमच्या इथे टोलामध्येही सत्यनारायणाची पूजा घालण्यात येते. त्यासाठी, ब्राह्मण येतात आणि म्हणतात आम्ही जेवण करणार नाहीत, तुम्ही रोख रक्कम द्या. पूर्वी गरिबांच्याघरी ही पूजा होत नसत. मात्र, आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहे, असे मांझी यांनी म्हटले.
बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत मांझी म्हणाले की, सन 1956 मध्ये जीवनाच्या शेवटच्या काळात बाबासाहेबांनी हिंदू धर्माला खराब म्हटलं होतं. त्यांचे निधन बौद्ध धर्मातच झाले. त्यांनी मृत्युपूर्वी बौद्ध धर्म स्विकारल्याचेही त्यांनी सांगितले. मांझी यांचा या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे, मांझी यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिलंय. माझ्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत ब्राह्मणांसदर्भात केवळ तितकंच सांगण्यात आलंय, ज्यातून वाद निर्माण होईल. त्यामुळे, माझा संपू्र्ण व्हिडिओ पाहावा, असे मांझी यांनी म्हटलंय. तसेच, समाजातील प्रत्येक घटकाबद्दल माझ्या मनात माझ्या कुटुंबाप्रमाणे इज्जत, आदर आहे. मी ब्राह्मण समाजाला नाही, तर आमच्याच समाजाला शिवी दिली होती, अशी सारवासारव त्यांनी केली.
यापूर्वीही श्री राम यांच्याबद्दल वादग्रस्त विधान
रामायण रचणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांना देशाने श्रद्धांजली अर्पण केली तेव्हा मांझी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. भगवान राम हे एक काल्पनिक पात्र होते, असे ते म्हणालेले. संतहे रामापेक्षा हजारो पटींनी मोठे होते. हा माझा व्यक्तीगत विचार होता, मी कोणाच्या भावना दुखवत नाहीय, असही त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं