Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. 'हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून नाही, तर डाव्या विचारसरणीच्या लोकांपासून धोका आहे,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हिमंता पुढे म्हणतात, मी काही लोकांचे भाषण ऐकतो, त्यांना वाटते की, आपण संविधान स्वीकारल्यापासून भारत वर्ष सुरू झाले आहे, परंतु तसे अजिबात नाही. भारत ही 5000 वर्षे जुनी संस्कृती आहे. हिंदू धर्म नष्ट करू, अशी शपथ घेतलेला औरंगजेब हिंदू धर्म नष्ट करू शकला नाही. पण तो स्वतःच संपला. जर राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना हिंदू धर्म नष्ट होईल, असे वाटत असेल, तर मी म्हणेन तुमचा नाश होईल, हिंदू धर्म कधीच संपणार नाही.
मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून हिंदूंना धोका नाहीडाव्या आणि उदारमतवादी लोकांनी या देशाला विळखा घातला होता. अशा लोकांना पद्मश्री मिळाले, जे विशेषतः हिंदूंच्या विरोधात बोलायचे. देश सावरणार नाही, असे 2014 पर्यंत वाटायचे. अनेक घोटाळे झाले, हिंदूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यावेळी हिंदू बोलू नका, धर्मनिरपेक्ष बोला, असे सांगितले गेले. देशाच्या पंतप्रधानांनी तर देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क असेल, असे म्हटले होते. खर तर हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून धोका नाही, तर हिंदूंना धोका आपल्या समाजापासूनच आहे.
आपल्यासाठी सर्वात मोठा धोका डाव्या आणि उदारमतवादी लोकांकडून आहे. कोणत्याही मुस्लिमाने भारताच्या इतिहासाची पुस्तके बदलली नाहीत. रोमिला थापरसारख्या व्यक्तीने जेएनयूमध्ये बसून आपल्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण केले. जेएनयूमध्ये बसून ज्यांनी आपला समाज आणि देश उद्ध्वस्त केला ,ते दुसरे कोणीही नसून हिंदू आहेत.
आपण असा समाज निर्माण केला पाहिजे जिथे भविष्यात डावे किंवा उदारमतवादी जन्माला येणार नाहीत. म्हणूनच मी म्हणतो की आपण एकजूट राहायला हवे. आपण एकत्र राहिलो तर कोणतीही ममता बॅनर्जी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही. जोपर्यंत भारत हिंदूंना सुरक्षित ठेवेल तोपर्यंत इतर धर्मही सुरक्षित राहतील, यावर माझा नेहमीच विश्वास आहे, असेही ते यावेळी म्हणाले.