ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - धर्माच्या आधारावर होणा-या हिंसाचाराच्या भितीने आश्रयासाठी भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना लवकरच भारतीय नागरीकत्व मिळू शकते. केंद्रीय गृहमंत्रालय त्यासाठी भारतीय नागरीकत्व कायद्यामध्ये सुधारणा करण्यास तयार आहे.
नागरीकत्व कायदा १९५५ मधील प्रस्तावित बदलांमुळे शरणार्थींना भारतात रहाण्याचा कायदेशीर अधिकार मिळणार असून, त्यांना नागरीकत्वासाठी दावा करता येईल. कायद्यातील प्रस्तावित बदल प्रत्यक्षात आल्यानंतर आपले सरकार हिंदूचे संरक्षणकर्ते असल्याचा संदेश जाणार असून, त्यातून राजकीय उद्देशही साध्य होणार आहे.
पाकिस्तान, बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांक असून तेथे धर्माच्या आधारावर होणा-या हिंसाचारामुळे अनेक हिंदूंनी भारतात आश्रय घेतला आहे. या निर्णयाचा पाकिस्तान-बांगलादेशातून आलेल्या दोन लाख हिंदूंना फायदा होणार आहे.
कायद्यात बदल करुन हिंदूंना नागरीकत्व दिले तर, आर्थिक कारणांमुळे बांगलादेशातूनही अनेक मुस्लिम भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्ये आले आहेत. सरकारने फक्त हिंदूंना नागरीकत्वाचा लाभ दिला तर, सरकार जाणीवपूर्वक शरणार्थींमध्ये भेदभाव करत असल्याचाही संदेश जाईल. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने हिंदू शरणार्थींना नागरीकत्व देण्याचे वचन दिले होते.