उडुपी - भारतातील हिंदू मंदिरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. दहशतवाद्यांकडून हिंदू समाजाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीने हातात मोबाइल नव्हे तर शस्त्रे उचलायला हवीत, असे विधान हिंदू धर्मगुरू स्वामी नरेंद्रनाथ यांनी कर्नाटकातील उडुपी येथे केले. विश्व हिंदू परिषदेतर्फे उडुपी येथे तीन दिवसांच्या धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्वामी नरेंद्रनाथ यांनी हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या घटनांचा मुद्दा उपस्थित केला.
लाखोंच्या किंमतीचे मोबाइल जवळ बाळगण्याची गरजच काय आहे? सुरक्षा आणि आत्मसंरक्षणासाठी प्रत्येक हिंदू व्यक्तीने मोबाइलऐवजी शस्त्रे उचलायला हवीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संभाव्य संकटांपासून वाचण्यासाठी आणि त्याबाबत हिंदूंमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी हे आवाहन केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, धर्म संसदेच्या पहिल्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनीही उपस्थितांना संबोधित केले होते. 'अयोध्येत राम मंदिरच उभे राहील आणि तिथे असलेल्या शिळांचा वापर करूनच होईल. लवकरच राम मंदिरावर एक भगवा ध्वज फडकताना दिसेल. तो दिवस फार दूर नाही,' असे भागवत म्हणाले होते.