भोपाळ - देशातील लोकप्रिया आणि कायम चर्चेत असणारे कथावाचक महाराज देवकीनंदन यांनी केलेल्या विधानावरुन आता चांगलाच गोंधळ सुरू झाला आहे. भोपाळच्या दशहरा मैदानात सध्या देवकीनंदन यांचे कथावाचन सुरू आहे. त्यासाठी, हजारो भक्तांनी मंडपात गर्दी केली आहे. गेल्या ५ दिवसांपासून येथे कथावाचन सुरू असून यात देवकीनंदन यांनी केलेल्या काही विधानांची जोरदार चर्चा होत आहे. त्यासोबतच, हे विधान वादग्रस्त असल्याने टीकाही होत आहे. नुकतेच त्यांनी मुलं जन्माला घालण्याबाबत केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे.
अल्पसंख्याक हे ४०-४० मुलं जन्माला घालू शकतात, मग आपण हिंदू ४-५ मुलं जन्माला घालू शकत नाहीत का, असे विधान देवकीनंदन यांनी केले. माझे स्वत:चे ४ मुलं आहेत, त्यामुळे मी हिंदूंना ५-५ मुलं जन्माला घालण्याचे बोलतोय, असेही त्यांनी म्हटले. जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रण कायदा होत नाही, तोपर्यंत बहुसंख्य राहाल असे कार्य करा. सनातनी हेच बहुसंख्य असायला हवेत, अन्यथा हा देश सेक्युलर राहणार नाही, असेही देवकीनंदन यांनी म्हटले. ते म्हणतात आम्ही ६० कोटी झाल्यानंतर हा देश आमचा होईल, आत्ता ते ३० कोटी आहेत, तरीही तशी भाषा करतात. युट्यूबवर याबाबतचे व्हिडिओ पाहायला मिळतील. हे आत्ताच असं बोलत असतील, मग पुढे काय होईल, असा प्रतिप्रश्नच देवकीनंद महाराज यांनी दै. भास्करशी बोलताना विचारला आहे.
दरम्यान, इतिहासाच्या पुस्तकातून मुघल साम्राज्याचा अभ्यासक्रम हटवला आहे, पण येथील रस्त्यावरुनही त्यांची नावे हटवायला हवीत. या देशात प्रभू राम-कृष्ण हे महान होते, आणि राम-कृष्ण हेच महान राहतील, असेही देवकीनंदन यांनी म्हटलयं.