ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 8 - भारतीय वंशाच्या मुस्लीम धर्मांतरीत व्यक्तिला इस्लामिक स्टेटला पाठिंबा दर्शवल्याच्या कारणावरून अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अमेरिकी सैनेत प्रवेश करण्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवम पटेल (वय 27) असे आरोपीचे नाव असून अमेरिकी सैन्यात दाखल होण्यासाठी अर्ज करताना त्याने चीन व जॉर्डनला प्रवास केल्याची माहिती लपवली.
अमेरिकेतील दी व्हर्जिनियन पायलटने हे वृत्त दिले आहे. गेल्या सात वर्षांत आपण भारतातली एक फेरी वगळता अमेरिकेबाहेर कुठेही गेलो नव्हतो असा दावा त्याने केला होता. या आरोपासाठी पटेलला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अनेक वर्षांपूर्वी इस्लाममध्ये धर्मपरीवर्तन केलेला पटेल गेल्या वर्षी इंग्लिश शिकवण्यासाठी चीनला गेला होता. त्यावेळी चीनमध्ये मुस्लीमांना वाईट वागणूक दिली जाते, असे मतही त्याने वडिलांजवळ व्यक्त केलं होतं. पटेलला त्याच्या कंपनीने चीनमधून अमेरिकेला परत पाठवले. परंतु तो चीनला न येता जॉर्डनला गेला, तिथं त्याला अटक करून अमेरिकेत पाठवण्यात आले होते. एफबीआयशी बोलताना त्याच्या पालकांनी शिवम इस्लामच्या आहारी गेल्याचे मत नोंदवले होते.
शिवम पटेल (सौजन्य - न्यूजइंडियाटाइम्स डॉट कॉम)
शिवमच्या खोलीची तसेच कम्प्युटरची तपासणी केली असता त्याने इस्लामिक स्टेटचं साहित्य डाइनलोड केल्याचे आढळले आहे. तसेच, इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी काय करावं लागेल याचा शोधही शिवम घेत होता असे दिसून आले आहे. हिंसात्मक मार्ग न वापरता जिहाद करण्याची व शहीद होण्याची कामनाही त्यानं काही जणांकडे व्यक्त केली होती. अल कैदाचा ठार मारण्यात आलेला नेता अन्वर अल अवलाकीची तारीफ शिवमने केली होती, तसेच पॅरीस, नाईस व ओरलँडो येथे करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांची प्रशंसा त्याने केली होती. काहीतरी भव्य करायचं आणि अल्लाहसाठी प्राण द्यायचे अशी भावना त्याने एका गुप्त एजंटकडे व्यक्त केली होती. मुस्लीम व मुस्लीमेतर यांच्यात धार्मिक युद्ध व्हावे अशी त्याची इच्छा असल्याचंही तो एकाजवळ बोलला होता.
इस्लामिक स्टेटचा झेंडा शेजारच्या घरी लावलेल्या अमेरिकेच्या झेंड्याच्या जागी लावण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली होती. या सगळ्या प्रकारांनंतर त्याने अमेरिकी सैन्यात दाखल होण्यासाठी अर्ज केला. अमेरिकी जनतेमध्ये एकजीव व्हायचं आणि काहीतरी भव्य कारवाई करायची अशी त्याची योजना असल्याचा निष्कर्ष एफबीआयनं काढला आहे. शिवम पटेलच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून असलेल्या आणि गंभीर परिणाम होण्याची शक्यता दिसत असलेल्या एफबीआयने त्याला अटक करून ही सगळी माहिती अमेरिकी कोर्टात सादर केली आहे.
आणखी वाचा...