नवी दिल्ली - गदरफेम तारासिंग आणि बॉर्डरफेम अभिनेता सनी देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींनी सनीसोबतचा आपला फोटो शेअर करत, आम्ही दोघेही 'हिंदुस्थान जिंदाबाद था, है, और रहेगा'साठी एकत्र असल्याचे म्हटले आहे. रविवारी सकाळी सनी देओलने मोदींची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाने गुरुदासपूरमधून अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर अभिनेता सनी देओल याला लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.
सनी देओलला भेटून आनंद झाल्याचे मोदींनी म्हटले आहे. सनीचे देशप्रेम आणि त्यांच्यातील माणूसकीचा मी मोठा चाहता असल्याचे मोदींनी म्हटले आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सनी देओल यांचा आग्रह असल्याचे सांगत सनीला भेटून मला आनंद झाला. हिंदुस्तान जिंदाबाद था, है और रहेगा असे म्हणत देश जिंदाबाद राहण्यासाठी आम्ही कायम एकत्र असल्याचेही मोदींनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.
गुरुदासपूर येथून भाजपा तिकीटावर निवडणूक लढविणाऱ्या सनी देओलला रोखण्यासाठी काँग्रेसने आवश्यक ती तयारी सुरू केली आहे. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे सुनील जाखड विजयी झाले होते. काँग्रेसकडून पुन्हा एकदा जाखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशात राष्ट्रवाद आणि देशभक्तीची लहर आली आहे. राष्ट्रवादाचा फायदा घेण्यासाठी भाजपकडून गुरुदासपूरमधून सनी देओल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बॉर्डर आणि गदर चित्रपटातून सनी देओलची राष्ट्रवादी प्रतिमा तयारी झाली आहे. त्यामुळेच, 'गदर' चित्रपटातील डायलॉग आपल्या ट्विटरवर लिहित, सनीला भेटून आनंद झाल्याचे मोदींनी म्हटले आहे.