संदीप प्रधानगोध्रा : गोध्रा ही भारतीय जनता पार्टीची हिंदुत्वाची प्रयोगशाळा. मागील तीन निवडणुकीत येथे धर्माचे नाणे खणखणीत वाजले. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाटीदार आंदोलनामुळे सर्वच जातींना आपली ताकद दाखवण्याची खुमखुमी वाटू लागल्याने या मतदारसंघातील ९० हजार ओबीसी जातीचे कार्ड चालवण्यासाठी सज्ज झाले आहेत.अडीच लाख मतदारसंख्या असलेल्या गोध्रा विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या ५४ हजार आहे, तर हिंदू मतदार (ज्यामध्ये ब्राह्मण, बनिया, राजपूत हे उच्चवर्णीय येतात) त्याची ५० हजार आहे. याखेरीज ओबीसी मतदारांची संख्या ९० हजार असून, पाटीदार आंदोलन प्रभावी झाल्यावर ओबीसी नेत्यांचे एक शिष्टमंडळ खातूभाई पागी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटले आणि त्यांनी ओबीसी उमेदवार देण्याची मागणी केली. मात्र भाजपाने सुमनबेन चौहान या एकमेव ओबीसी महिलेला कलोल मतदारसंघातून उमेदवारी दिली. सुमनबेन या मूळच्या मेहलोलमधील असून कलोलमध्ये त्यांचे मतदान नसल्याने स्थानिक भाजपा इच्छुक व ओबीसी नाराज आहेत.गोध्रा मतदारसंघातून भाजपाने गेली दहा वर्षे काँग्रेसचे आमदार असलेले व अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे सी. के. राऊळ यांना उमेदवारी दिली. राऊळ राजपूत आहेत. काँग्रेसने त्यांच्या विरोधात राजेंद्र पटेल या ओबीसी उमेदवाराला संधी दिली आहे. मात्र रा. स्व. संघ परिवारातील डॉ. जसवंत परमार या ओबीसी नेत्याने भाजपाविरुद्ध बंड केले आहे. परमारना भाजपाने निलंबित केले आहे. गोध्रासह पंचमहालमध्ये राजपूतांची संख्या २५ हजार असून, सी. के. राऊळ (गोध्रा) व जयद्रसी परमार (हलोल) या मतदारसंघांतून राजपूतांना भाजपाने संधी दिली. भरवाट समाजाची केवळ १६०० मते असताना जेठभाई भरवाट (सहेरा) येथून भाजपाने उमेदवारी दिली. यामुळे ओबीसी नाराज आहेत.राज्यात भाजपाची तब्बल २२ वर्षे सत्ता असताना (२००२ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता) गोध्रामध्ये काँग्रेसचा आमदार निवडून येत होता. आता काँग्रेसमधून उमेदवार आयात करून गोध्रात सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. त्यामुळे गोध्रात लोक गमतीने म्हणतात की, गोध्रा भाजपाने जिंकले तर मग राज्यात कुणाची सत्ता येणार?
हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेत यंदा जातीचे कार्ड चालविण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 3:19 AM