- विकास झाडे
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे परत घेतले नाहीत, तर येत्या गणतंत्र दिवशी राजपथचे नाव बदलून कृषिपथ करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दिला आहे, तर सरकारला सद्बुद्धी येवो म्हणून शेतकऱ्यांनी सामूहिक प्रार्थना केली.आंदोलनाच्या २४ व्या दिवशीही शेतकऱ्यांनी वेगवेगळे महामार्ग जाम केले आहेत. आता आमची परीक्षा घेऊ नका, असा इशारा देत मोदी सरकारला सद्बुद्धी येवो यासाठी गौतमबुद्धनगर येथे दलित प्रेरणा स्थळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामूहिक प्रार्थना केली. भारतीय किसान युनियनतर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किन्नर समुदायाने आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले व कृषी कायद्याविरोधात गाणे म्हणत त्यांनी नृत्यही केले.कितीही कडाक्याची थंडी पडली तरीही कायदे मागे घेईपर्यंत जागचे हटायचे नाही असा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकऱ्यांची गर्दी आणि जिद्द दिसून येते. अन्य राज्यांतून दिल्लीत येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने काही रस्ते वळविले आहेत. ‘खाप’चे चौधरी सुरेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय महामार्ग जाम करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. त्यानुसार सहारनपूर महामार्ग जाम करण्यातआला. खापतर्फे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अन्य जिल्ह्यांतील खाप पंचायतचा पाठिंबा मिळाला आहे. यात मुस्लिम खाप पंचायतचाही समावेश आहे. तेलंगणाची अभिनेत्री लक्ष्मी पार्वती हिने चिल्ला सीमेवर जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. फतेहबाद येथे भाजपच्या नेत्यांनी उपवास ठेवले होते. शेतकऱ्यांनी पोलिसांचे बॅरिकेडस् तोडत उपवास स्थळ गाठले आणि तेथील भाजपचे पोस्टर्सफाडले. सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सरकारने तिन्ही कायदे परत घ्यावेत व शेतकऱ्यांसोबत सहानुभूतीपूर्वक वागणूक ठेवावी, असे ट्वीट केले.
श्रद्धांजलीशेतकरी आंदोलनात आतापर्यंत विविध कारणांनी २९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात सिंघू, टिकरी सीमेशिवाय हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्या सगळ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सिंघू सीमेवर शनिवारी सकाळी ९ ते ११ पर्यंत पूजा करण्यात आली.