ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातामागे घातपात असण्याची शंका व्यक्त होत आहे. हिराखंड एक्सप्रेसला झालेल्य़ा अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र रुळांना नुकसान पोहोचवण्यात आल्याने किंवा तोडफोड केल्याने अपघात झाल्याची शक्यता रेल्वे मंत्रालयाने नाकारलेली नाही.
शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात आतापर्यंत 32 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातामागे घातपात असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेला अपघात होण्यापूर्वी याच मार्गावरून एक मालगाडी व्यवस्थितपणे मार्गस्थ झाली होती, तसेच ट्रॅकमननेही रेल्वे रुळांची पाहणी केली होती. मात्र हा अपघात होण्यापूर्वी एक्स्प्रेसच्या चालकाने रुळांवर फटाके फुटण्यासारखा आवाज ऐकला होता.
दरम्यान, हिराखंड एक्स्प्रेसला जिथे अपघात झाला तो भाग नक्षलवादाने प्रभावित विभागात असून, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वाभूमीवर रेल्वे रुळांना नुकसान पोहोचवण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या अपघातामागे घातपात असण्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात कानपूरजवळ इंदुर-पटना एक्स्प्रेसला झालेल्या भीषण रेल्वे अपघातामागे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना असल्याचे समोर आले होते.
Sabotage not ruled out in #HirakhandExpress derailment, says Railway Ministry sources— ANI (@ANI_news) 22 January 2017