कानपूरमधील ८ पोलिसांच्या हत्याकांडाचा आरोप असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याचा शुक्रवारी पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये खात्मा केला आहे. पोलिसांवर पिस्तूल रोखून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर त्याचे वडिल राम कुमार दुबे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विकासचे वडील म्हणाले की, विकासला ठार मारलं, ते बरं झालं. विकासच्या अंत्यविधालाही मी जाणार नाही, असं राम कुमार दुबे यांनी सांगितले. तसेच विकासच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने स्वत:ला घरात बंद करुन घेतलं आहे. त्याचप्रमाणे विकासच्या मृत्यूनंतर सरला देवी यांची प्रकृती बिघडली असल्याचीही माहिती समोर आली आहे.
विकास दुबेला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची आई सरला देवी यांनी विकाससोबत आमचा काहीही संबंध नव्हता, अशी माहिती पोलिसांना दिली होती. सरकारला जे योग्य वाटतं ते करावं, असं मत सरला देवी यांनी व्यक्त केलं होतं.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेश एसटीएफच्या गाडीतून विकासला कानपूरला नेलं जातं होतं. त्यावेळी बर्राजवळ गाडीला अपघात झाला. गाडी उलटल्यानं विकास दुबे आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. मात्र यानंतरही विकासनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानं एका एसटीएफ अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली. पोलिसांनी त्याला सरेंडर करण्यास सांगितलं. मात्र विकासनं पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. यानंतर विकास दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली.
विकास दुबे पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चकमक सुरू झाली. त्यामध्ये विकास दुबे गंभीर झाला. त्यानंतर त्याला कानपूरच्या हॅलट रुग्णालयात आणण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश विकासचा शोध घेत होते. अखेर गुरुवारी मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना विकास दुबेला तिथल्या काही जणांनी ओळखलं. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर विकासला अटक झाली होती.