नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेत आभाराचे भाषण केले. मोदींनी सर्व खासदारांचे स्वागत केले, तर पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवणाऱ्या खासदारांचेही कौतुक केले. लोकसभा अधिवेशनातील चर्चासत्रात जवळपास 60 खासदारांनी सहभाग घेतला. अनुभवी खासदारांनी आपल्या परीने उत्तम भाषण केले. तर नव्याने आपल्या खासदारांनीही चर्चासत्रात अतिशय उत्कृष्टपणे चर्चा घडवून आणल्याचे मोदींनी म्हटले.
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील खासदार हिना गावित आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाचाही यावेळी उल्लेख केला. हिना गावित यांनी आदिवासी संदर्भात मांडलेले मुद्दे आणि खासदार सारंगी यांचं भाषण ऐकल्यानंतर आता मी काय बोलू, असा प्रश्न मला पडला आहे, अशा शब्दात हिना गावित यांच मोदींनी कौतुक केलं. त्यासोबतच, खासदार असुदुद्दीन औवेसी यांच्यासह सभागृहाती अन्य खासदारांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत त्यांचे कौतुक केले. मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा आणीबाणीवरुन काँग्रेसला लक्ष्य केलं. आणीबाणीचा डाग कदापी पुसला जाणार नाही, असे म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ''हम किसी की लकीर छोटी करने मे अपना समय नही बरबाद करते, हम अपनी लकीर बडी करने मे जिंदगी खपा देंगे. आपकी उंचाई आपको मुबारक हो, आप इतना उँचा चले गए है की, आपको जमीन दिखनी बंद हो गयी है. जडों से उखड गए है..'', असा टोलाही मोदींनी लगावला. तसेच, देशातील 130 कोटी जनतेनं पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताच्या सरकारची निवड केली आहे. पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला सार्थक बनवण्यासाठी सर्वांनी काम करायचं आहे, असेही मोदींनी म्हटले.