आसाम आणि मेघालयमधील ५० वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद अखेर संपुष्टात आला आहे. दोन्ही राज्यांमध्ये ऐतिहासिक करार झाला आहे. दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या कराराला सहमती दर्शवली आहे. मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, खासदार दिलीप सेकिया आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांनी राजधानी दिल्लीत गृहमंत्री शाह यांची भेट घेतली. यादरम्यान सीमा विवाद सोडवण्यासाठी करार करण्यात आला आहे.
दोन्ही राज्यांच्या सीमावादाच्या १२ पैकी ६ मुद्द्यांचे निराकरण करण्यात आले आहे, ज्यात सीमेच्या जवळपास 70% भागांचा समावेश आहे. उर्वरित 6 मुद्दे लवकरात लवकर सोडवले जातील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. दोन्ही राज्यांमधील ७० टक्के सीमा आज वादमुक्त झाली आहे. यापुढील वाद आम्ही चर्चेनेच सोडवू, असे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आज मोठे काम झाले आहे. शाह यांनी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारच्या वतीने दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. "पंतप्रधान मोदींनी पाहिलेले विकसित ईशान्येचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत ४,८०० हून अधिक शस्त्रांचं कायदेशीररित्या अधिकार्यांसमोर आत्मसमर्पण करण्यात आले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.