ऑनलाइन लोकमत
इंदुर, दि. 16 - शहीद भगत सिंग यांनी ज्या बंदुकीने ब्रिटीश अधिकारी जॉन सँडर्सची गोळ्या घालून हत्या केली होती, त्य बंदुकीला पाहण्यासाठी लोकांसमोर सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जवळपास 90 वर्षांनंतर, भगत सिंग यांची .32 एमएम कोल्ट ऑटोमॅटिक असलेले ही बंदूक इंदुर येथील सीएसडब्ल्यूटी संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.
17 डिसेंबर 1928 साली भगत सिंग आणि राजगुरू यांनी ब्रिटीश अधिकारी जॉन सँडर्सची गोळ्या घालून हत्या केली होती. सायमन कमिशनला विरोध करताना झालेल्या लाठीचार्जमध्ये जखमी होऊन लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगत सिंग आणि राजगुरू यांनी सँडर्सची हत्या केली.
ज्या बंदुकीने सँडर्सवर गोळी चालवण्यात आली होती, ती इंदुरमधील सीएसडब्ल्यूटी संग्रहालयाच्या स्टोअर रुममध्ये होती. मात्र ही बंदूक भगत सिंग यांची आहे, याबाबत सर्वजण अनभिज्ञ होते. बंदुकीबाबत माहिती समोर आल्यानंतर तिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे.
प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या या बंदुकीची जबाबदारी सीएस डब्ल्यूटी संग्रहालयाचे सहाय्यक समादेशक कमांडंट विजेंद्र सिंह यांच्यावर आहे. विजेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगत सिंग यांच्या बंदुकीचा सीरियल नंबर सँडर्स हत्या प्रकरणातील बंदुकीसोबत तपासून पाहिला असता, ते दोन्ही क्रमांक एक सारखे असल्याचे आश्चर्यकारक माहिती समोर आले.
ही माहिती उजेडात आल्यानंतर संग्रहालयातील ही बंदूक भगत सिंग यांची असल्याचे समजले. यानंतर मंगळवारपासून बंदूक पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. दरम्यान, या संग्रहालयात कित्येक प्रकारची शस्त्रात्रं पाहायला मिळतील ज्यांचा ऐतिहासिक घटनांशी संबंध आहे. दुस-या महायुद्धापासून ते आतापर्यतची विशेष प्रकारची शस्त्रं या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत.