हैदराबाद : हैदराबादेतील ऐतिहासिक चारमिनारचा एक भाग कोसळला आहे. ही माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे (एएसआय) अधिकारी या नुकसानीचे निरीक्षण करून त्याबाबत अधिक माहिती घेत आहेत. शहरातील हा ऐतिहासिक चारमिनार ४०० पेक्षा अधिक वर्षांपूर्वीचा आहे. चारमिनारची देखभाल एएसआय करते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा मिनारचा नवनिर्मित भाग होता. बुधवारी रात्री हा भाग मिनार परिसरात कोसळला. प्राथमिक माहितीनुसार, अशी शक्यता आहे की, ज्या ग्रेनाईटच्या भागाला चुन्याच्या बांधकामाचा एक भाग जोडण्यात आला होता. तो व्यवस्थित जोडला गेला नाही आणि खाली पडला. चारमिनारची निर्मिती १५९१ मध्ये कुतूबशाही वंशाचे पाचवे शासक मोहम्मद कुली कुतूबशाह यांनी केली होती. शाह यांनीच हैदराबाद शहराची स्थापना केली होती. ऑगस्ट २०१० मध्ये या चार मिनारपैकी एक भाग गळतीमुळे ढासळला होता. या वास्तूमध्ये चारही भागाला लांब, सुरेखपणे कोरलेली चार मिनार आहेत.