कोलकाता: देशातील सर्वात जुनी मेट्रो सेवा असलेल्या कोलकाता मेट्रोने बुधवारी एक ऐतिहासिक कामगिरी केली. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज देशातील पहिली मेट्रो हुगळी नदीखालून धावली. भारतात पहिल्यांदाच मेट्रोने नदीखालचा प्रवास केला आहे. मेट्रो रेकने 11:55 मिनिटात हुगळी नदी ओलांडली. यावेळी मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक पी उदय कुमार रेड्डी स्वतः उपस्थित होते.
ट्रेन आल्यानंतर रेड्डी यांनी हावडा स्टेशनवर प्रार्थना केली. नंतर रॅक क्रमांक MR-613 हावडा मैदान स्थानकात हलवण्यात आला. हावडा मैदान ते एस्प्लानेड अशी चाचणी पुढील 7 महिने सुरू राहील आणि त्यानंतर या विभागात नियमित सेवा सुरू होईल, अशी माहिती महाव्यवस्थापकांनी दिली. तसेच, त्यांनी या घटनेला ऐतिहासिक घटना म्हटले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, लवकरच हावडा मैदान ते एस्प्लेनेड या 4.8 किमीच्या भूमिगत भागावर ट्रायल रन सुरू होईल. या विभागावरील व्यावसायिक सेवा या वर्षी सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. हा विभाग उघडल्यानंतर हावडा हे देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन (पृष्ठभागापासून 33 मीटर खाली) बनेल. मेट्रोने हुगळी नदीखालील 520 मीटरचा भाग 45 सेकंदात कव्हर करणे अपेक्षित आहे.
नदीखाली बांधलेला हा बोगदा पाण्याच्या पातळीपासून 32 मीटर खाली आहे. बोगद्यातील पाण्याचा प्रवाह आणि गळती थांबवण्यासाठी अनेक संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाणी शिरण्यापासून रोखण्यासाठी या भागात फ्लाय अॅश आणि मायक्रो सिलिका यापासून बनवलेले काँक्रीट मिश्रण वापरले आहे.