वाराणसी : वाराणसी शहरात विद्युत तारा आता खांबांवर लटकताना दिसणार नाहीत. या शहराला ८६ वर्षांपूर्वी वीज मिळाली होती त्यानंतर प्रथमच खांबांवरील वीज वाहक तारा काढून टाकून त्या भूमिगत करण्याचा प्रकल्प राबवला गेला आहे.या तारा भूमिगत करण्याचे १६ चौरस किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. वाराणसी शहर जगातील अत्यंत पुरातन शहरांपैकी एक असून अनेक वळणे घेतलेल्या गल्ली-बोळा व अत्यंत गर्दीच्या बाजारपेठांमध्ये वीज वाहक तारा भूमिगत करण्याचे काम पॉवरग्रीडसाठी फार मोठे आव्हान होते. या प्रकल्पाचे नाव इंटेग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम (आयपीडीएस) आहे. वीज वाहक तारा भूमिगत करण्याचे काम वाराणसी शहरात अत्यंत गुंतागुंतीचे असल्याचे आमच्या लक्षात आले, असे या प्रकल्पाचे व्यवस्थापक सुधाकर गुप्ता यांनी सांगितले.कंपनीने या कामासाठी दोन वर्षे घेतली व ते डिसेंबर २०१७ मध्ये पूर्ण झाले. माजी केंद्रीय उर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी जून २०१५ मध्ये या प्रकल्पासाठी ४३२ कोटी जाहीर केले होते. देशात ही योजना (आयपीडीएस) राबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४५ हजार कोटी रूपयांची घोषणा सप्टेंबर २०१५ मध्ये वाराणसीत केली होती. याची सुरवात (पायलट प्रोजेक्ट) कबीर नगर आणि अन्साराबादेत झाली. काम डिसेंबर २०१५ मध्ये सुरू झाले. गोयल या कामाची नियमितपणे पाहणी करायचे व हे काम दोन वर्षे मुदतीचे असले तरी वर्षभरात पूर्ण होईल, असे म्हणाले होते. प्रस्ताव आणि प्रत्यक्षातील मागणी यांच्यात महत्वाचे फरक तपशिलाच्या अहवालात आढळले, असे पॉवरग्रीडच्या अधिकाºयाने सांगितले.
ऐतिहासिक वाराणसी झाले वायरलेस!, लोंबकळणाऱ्या वीज तारा झाल्या भूमिगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:20 AM