नवी दिल्ली : सशस्त्र सीमा दलाच्या प्रमुख म्हणून आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या निम-लष्करी दलाच्या प्रमुख होणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी आहेत.१९८० च्या तामिळनाडूच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेल्या अर्चना रामसुंदरम यांच्या या नियुक्तीने नवा इतिहास घडला आहे. भारत-नेपाळ आणि भारत-भूतान सीमेचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी त्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो) संचालक होत्या. आजवरच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक चढ-उतारही अनुभवले आहेत. दोन वर्षापूर्वी सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी त्यांना केंद्र सरकारने पाचारण केले होते. त्यानंतर अवघ्या तासाभरातच पूर्वीचे पद न सोडल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबित करण्यात आले होते. दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले.त्यांच्या या नियुक्तीला (सीबीआय अतिरिक्त संचालक) सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सुरक्षा अस्थापनात फेरबदल करताना केंद्र सरकारने के. दुर्गाप्रसाद यांची केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
अर्चना रामसुंदरम यांनी घडविला इतिहास
By admin | Published: February 02, 2016 4:00 AM