सुलतानपूर - आगामी लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा झाली असून सगळेच राजकीय पक्ष प्रचारात उतरलेत. याआधीही आपल्याकडे अनेक लोकसभा निवडणुका झाल्यात. प्रत्येक वेळच्या निवडणुकीचा काही ना काही इतिहास आहे. असाच एक किस्सा १९९९ च्या निवडणुकीत घडला होता. विजयाची हॅट्रिक करणाऱ्या भाजपाने १९९९ मध्ये सुलतानपूर लोकसभेची जागा चौथ्यांदा न लढवता गमावली होती.
भाजपाचे उमेदवार उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज भरण्यासाठी पोहचले नाहीत. त्यामुळे विहित मुदतीनंतर दाखल केलेले त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला. राज्यात कल्याण सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार असताना हा प्रकार घडला. १९९१ मध्ये पहिल्यांदा भाजपाने रामलहरमधील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यानंतर पक्षाने रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित अयोध्या संत विश्वनाथ दास शास्त्री यांना उमेदवारी दिली होती. १९९६ मध्ये पक्षाने त्यांना संधी दिली नव्हती. त्यांच्या जागी वादग्रस्त वास्तू पाडल्याच्या वेळी फैजाबादचे (आताचे अयोध्या) वरिष्ठ पोलीस अधीक्षक असलेले देवेंद्र बहादूर राय यांना उमेदवारी देण्यात आली.
राय यांनी १९९६ आणि १९९८ मध्ये पक्षाची ही जागा कायम राखली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार एका मताने पडल्यानंतर १९९९ मध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या. यामध्ये पक्षाने पुन्हा उमेदवार बदलला. १९९९ च्या निवडणुकीत गोंडा येथील रहिवासी असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते सत्यदेव सिंह येथून उमेदवार होते. शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी/निवडणूक अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी विलंबाच्या कारणास्तव तो फेटाळला होता. या मुद्द्यावरून बराच वाद झाला होता. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका ठाम ठेवली. विहित मुदतीत अर्ज न आल्याने भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाला.
बसपाला झाला फायदा
भाजपा उमेदवार मैदानात नसल्याने त्याचा फायदा बसपाने उचलला. इथं बसपा उमेदवार जयभद्र सिंह यांनी विरोधी पक्षातील रामलखन वर्मा यांना हरवलं. सुलतानपूरच्या जागेवर पहिल्यांदाच बसपाचा उमेदवार विजयी झाला. त्यानंतर २००४, २००९ मध्येही बसपाच जिंकली. परंतु २०१४ च्या मोदी लाटेत याठिकाणाहून वरूण गांधी आणि २०१९ ला मेनका गांधी यांना उमेदवार बनवून भाजपाने ही जागा पुन्हा जिंकली.