- वसंत भोसले
पंतप्रधान चंद्रशेखर यांचा पाठिंबा काँग्रेसने मागे घेतल्याने मुदतपूर्व निवडणुकांशिवाय पर्याय नव्हता. देश दुसऱ्यांदा मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जात होता. मार्च ते मे या काळात मतदान होणार होते. मंदिर-मशीद वाद, मंडल आयोगाचा वाद आणि शाहबानो प्रकरणाचे पडसाद अशा तणावपूर्ण वातावरणात निवडणुका चालू होत्या. तीन टप्पे पूर्णही झाले होते. राजीव गांधी यांचा १९ मे १९९१ रोजी महाराष्टÑ दौरा होता. कागल (कोल्हापूर), पेठनाका (सांगली) आणि कºहाड (सातारा) येथे त्यांच्या सभा झाल्या. रात्री पुणेमार्गे ते नवी दिल्लीला रवाना झाले. त्यांचा तामिळनाडू दौरा २१ मे रोजी सुरू झाला. चेन्नईपासून ४० किलोमीटर अंतरावरील श्रीपेरुंबुदूर येथील मैदानावर त्यांची सभा होती. राजीव गांधी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते. अनेकवेळा ते रोड शो करीत रस्त्यावरच उतरत असत. जमावात जाऊन मिसळत. तसा प्रकार त्यांनी तेथील सभा रात्री १० वाजल्यानंतर केला. श्रीलंकेतील सिंहली-तामिळ वांशिक दंगलीत भारताने शांतिसेना पाठवून श्रीलंका सरकारला मदत केली होती. त्याचा सूड घेण्याच्या भावनेतून मानवी बॉम्बद्वारे राजीव गांधी यांच्यावर सभेच्या व्यासपीठाशेजारी १० वाजून २१ मिनिटांनी स्फोट घडवून आणण्यात आला. तामिळ अतिरेक्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तीन महिलांकरवी हा मानवी बॉम्बस्फोट करण्यात आला. त्यात राजीव गांधी यांची भीषण हत्या झाली. इंदिरा गांधी यांची हत्या सात वर्षांपूर्वी खलिस्तानच्या मागणीवरून झालेल्या हिंसाचारातून झाली होती. जवळपास तशीच हत्या तामिळ अतिरेक्यांकडून राजीव गांधी यांची करण्यात आली.लोकसभेच्या दहाव्या निवडणुकीला हा हादराच होता. कॉँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत होता. प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत भाजप आव्हान उभे करीत असताना, कॉँग्रेस मात्र नेतृत्वाविना पोरकी झाली. प्रथमच नेहरू-गांधी घराण्यातील नेतृत्वासाठी कोणी पुढे आले नाही.राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी तीन टप्प्यांतील मतदानही झाले होते. निवडणूक आयोगाने उर्वरित टप्पे पूर्ण करून, १६ मे रोजी निकाल घोषित केला. एकूण ४८७ जागा लढविणाऱ्या कॉँग्रेसला २३२ जागा मिळाल्या. भाजपने ४६८ लढवून १२० जिंकल्या. जनता दलास ५९, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ३५, तर भारतीय कम्युनिस्टांना १४ जागा मिळाल्या. पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळता त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. महाराष्ट्रात चांगले यश मिळवून काँग्रेसने ३८ जागा जिंकल्या. शिवाय कर्नाटक (२३), तामिळनाडू (२८), मध्य प्रदेश (२७), आंध्र प्रदेश (२५) या राज्यांमध्ये चांगले यश मिळाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मात्र कॉँग्रेसचा सफाया झाला. भाजपने उत्तर प्रदेशात ५१ जागा जिंकल्या. जनता दलाने बिहारमध्ये ३१ जागा तर उत्तर प्रदेशात २२ जागा जिंकल्या. या दोन्ही राज्यांतील १३९ जागांपैकी कॉँग्रेसला केवळ सहा जागा मिळाल्या. त्यात राजीव गांधी यांची एक होती.कॉँग्रेसला आता अनेक छोट्या पक्षांची गरज होती. प्रादेशिक पक्षांना ५० जागा मिळाल्या होत्या, तर ९ ठिकाणी अपक्ष निवडून आले होते. त्यांचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न झाला. भाजप-जनता दल एकत्र येऊनही बहुमत होणार नव्हते. भाजपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पाठिंबा देणार नव्हता. अशा परिस्थितीत कॉँग्रेसच्या नेतेपदी ज्येष्ठ नेते पी. व्ही. नरसिंह राव यांची निवड झाली. महाराष्टÑाचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार नेतृत्वाच्या स्पर्धेत उतरले; पण त्यांना यश आले नाही. नरसिंह राव यांनी पाठिंबा मिळवून, बहुमतापर्यंत जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ते सत्तेवर आले खरे, पण देशाची व सरकारची आर्थिक स्थिती गंभीर होती. परकीय गंगाजळी संपतच आली होती. सोने गहाण ठेवून व्यवहार चालू होते. अशा स्थितीत राव व डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक धोरणांना नवे वळण देण्याचे ऐतिहासिक कार्यकेले.