भोपाळ: इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं म्हणतात. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बाबतीत तसंच काहीसं घडताना दिसत आहे. ग्वाल्हेर संस्थानचे तत्कालीन प्रमुख असलेल्या माधवराव शिंदे यांनी घडवलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती ज्योतिरादित्य करणार आहेत. १९०४-०५ मध्ये माधवरावांनी आफ्रिकन सिंह मध्य प्रदेशात आणले. कुनोच्या खोऱ्यात सिंह सोडण्यात आले. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती ११८ वर्षांनी ज्योतिरादित्य शिंदे करणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये गुजरात हादेखील समान धागा आहे.
माधवरावांनी आफ्रिकेतून सिंह आणले. आता त्यांचेच वंशज असलेले, चौथ्या पिढीतले ज्योतिरादित्य त्याच आफ्रिकेतून चित्ते आणणार आहेत. १९०४ मध्ये जुनागढ संस्थान होतं. तिथल्या नवाबाकडून माधववरांनी गिरचे आशियाई सिंह मागितले होते. मात्र नवाबानं सिंह देण्यास नकार दिला. त्यानंतर माधवरावांनी दक्षिण आफ्रिकेतून सिंह आणले. पुढे हे सिंह कुनो खोऱ्यात राहू लागले. त्यांच्यासाठी त्यावेळी २०-२० फूट उंच पिंजरे तयार करण्यात आले होते.
आता माधवरावांच्या चौथ्या पिढीतले वंशज असलेले ज्योतिरादित्य शिंदे आफ्रिकन चित्ते भारतात आणणार आहेत. त्यासाठी त्यांनी पर्यावरण मंत्र्यांशी चर्चादेखील केली आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानाची स्थापना गुजरातच्या गिरमधील सिंहांना आणण्याच्या उद्देशानं झाली. तब्बल २६ वर्षांपूर्वी या प्रकल्पावर काम सुरू झालं. ५ हजाराहून अधिक आदिवासींना त्यांची जमीन सोडावी लागली. त्यांच्या हातून रोजगार गेला. मात्र २६ वर्षांनंतररही कुनोमध्ये आशियाई सिंह आले नाहीत.
माधवरावांनी जुनागढच्या नवाबानं आशियाई सिंह दिले नव्हते. आता मध्य प्रदेश सरकारला गुजरात सरकारनं सिंह दिले नाहीत. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. न्यायालयानं गुजरात सरकारची कानउघाडणी केली. मध्य प्रदेश सरकारच्या बाजूनं निर्णय दिला. गुजरातनं सिंह देण्यास नकार दिला नाही. गुजरात सरकारनं वेगवेगळी कारणं दिली. मात्र सिंह काही दिले नाहीत. आशियाई सिंह केवळ गिरमध्येच आढळतात. त्यामुळे आशियाई सिंह गुजरातची ओळख आहे. ही ओळख गुजरातला कायम ठेवायची आहे. गुजरात सिंह देत असल्यानं अखेर ज्योतिरादित्य यांनी आफ्रिकेतून चित्ते आणण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.