नवी दिल्ली - सार्वजनिकरित्या राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मी काँग्रेस अध्यक्ष नाही असं स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत गांधी कुटुंबाव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष असावा असा आग्रह त्यांनी धरला आहे. त्यामुळे नवीन काँग्रेस अध्यक्ष गांधी कुटुंबातील नसेल.
काँग्रेसच्या सर्वात कठीण काळात राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाची पुरती वाताहात झालेली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षपद सोडून राहुल गांधी यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत मोठा धोका पत्करला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
राहुल गांधींच्या या निर्णयामुळे 21 वर्षानंतर काँग्रेस पक्षाची कमान नेहरु-गांधी कुटुंबाबाहेरील नेत्याच्या हातात जाणार आहे. इंदिरा आणि राजीव गांधी यांच्यानंतर गांधी कुटुंबातून सोनिया गांधी 1998 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हातात घेतली. 2017 पर्यंत त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या काळात 10 वर्ष पक्ष सत्तेत होता. त्यांच्यानंतर 2017 मध्ये राहुल गांधी यांचा काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
2004 मध्ये राजकारणात प्रवेश केलेले राहुल गांधी यांच्याकडे 2007 मध्येही काँग्रेस महासचिवपदाची जबाबदारी आली. राहुल यांनीच एनएसयूआय आणि युवक काँग्रेसमध्ये पदांवर निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्याची सुरुवात केली. राहुल गांधी यांनी गांधी कुटुंबाशिवाय इतर नेत्याला काँग्रेसची धुरा सोपविण्याचा घेतलेला निर्णय कितपत यशस्वी होईल हे आता सांगणे कठीण आहे.
ज्येष्ठ पत्रकार रशीद किदवई यांच्या सांगण्यानुसार राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. गांधी कुटुंबाशिवाय इतर कोणीही नेते पक्ष वाढविण्यासाठी मेहनत घेताना दिसत नाही. दुसऱ्या पक्षात नेत्यांसह कार्यकर्तेही मेहनत करतात. मात्र काँग्रेसमध्ये नेते मेहनत करण्यास तयार नाहीत. जर पक्षाला यशस्वी करायचं असेल तर सगळ्या नेत्यांनी मेहनत घेणे गरजेचे आहे. 1989 नंतर गांधी कुटुंबाचा कोणताही सदस्य पंतप्रधान बनला नाही. त्याच धर्तीवर काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाला अध्यक्षपदापासून मुक्त ठेवण्याचा निर्णय घेतला गेला असावा.