आग्रा : आग्रा येथील किल्ल्यात रविवारी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रीय मंत्री, राज्यातील अर्धा डझन मंत्री आणि देशभरातील सुमारे 10 हजार शिवप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी आग्रा येथे दाखल होत आहे.
आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये प्रथमच शिवजयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली. जेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान तळपला, त्याच ठिकाणी आज 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शिवजयंतीचा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी किल्ल्यामधे ४०० शिवभक्तांना प्रवेश राहणार आहे. तर १० हजार शिवभक्त राज्यभरातून उपस्थित राहणार आहेत.
अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशन आयोजित करत असलेल्या या शिवजयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती राहणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा वेध घेणारा भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने दिवान ए आम समोर भव्य स्टेज उभारला जात आहे. या शिवजयंती सोहळ्याची सुरवात महाराष्ट्र गीताने होईल आणि त्यानंतर शिवाजी महाराज आग्र्यावरून कसे महाराष्ट्रात परतले याबाबतचं एक विशेष नाटक या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुरातत्व विभागाचे कॅबिनेट मंत्री जी. किशन रेड्डी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे आदी मान्यवर मार्गदर्शन करतील. यानंतर नेत्रदीपक आकर्षक आतिषबाजीने सोहळ्याची सांगता होईल.
आज होत असलेल्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण आग्रा शहरात भगवे झेंडे आणि होर्डिग्ज लावण्यात आल्या आहेत. आग्रा किल्ल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याला फुलांनी सजावट करण्यात आली आहे. पारंपरिक वेषभूषा करून स्थानिक मराठी बांधव, महिला आणि लहान मुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करीत अभिवादन करीत आहेत.