नवी दिल्ली - काश्मीर प्रश्नावरून आज राज्यसभेत काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार खडाजंगी उडाली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गेल्या चार वर्षांत काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढल्याचा आरोप करत केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मात्र अरुण जेटली यांनी सरकारच्यावतीने पलटवार करताना काश्मीर प्रश्न हा काँग्रेसकडून सातत्याने अवलंबल्या गेलेल्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. ज्यामधून काँग्रेसला कधीही मुक्ती मिणार नाही. आता इतिहासच फैसला करेल की काश्मीरबाबत श्यामाप्रसाद मुखर्जींचे धोरण योग्य होते की पंडित जवाहरलाल नेहरुंचे. राज्यसभेत काश्मीर प्रश्नी झालेल्या चर्चेवेळी गुलाम नबी आझाद म्हणाले की, काश्मीर प्रश्न समजून घेण्यासाठी इतिहास जाणून घेणे गजरेचे आहे. 1946 पासून काश्मीरमध्ये टून नेशन थिअरी हा सर्वात मोठा मुद्दा आहे. जोपर्यंत इतिहास जाणून घेतला जात नाही तोपर्यंत सरकारांकडून चुका होत राहतील.'' यावेळी भाजपा राज्यात फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात होती, असा आरोपही आझाद यांनी केला. ''गेल्या चार वर्षांत सर्वाधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच दहशतवादही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये सर्वाधिक नागरिक या चार वर्षांत मारले गेले आहेत.असा आरोपही आझाद यांनी यावेळी केला. आझाद यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जेटली म्हणाले की, काश्मीरमध्ये ज्या वेगळ्या अस्तित्वाची कल्पना केली गेली ती गेल्या सत्तर वर्षांत फुटीरतेकडे वळली आहे. काँग्रेसने जी आश्वासने दिली त्याची किंमत देशाला अनेक वर्षांपर्यंत मोजावी लागली. 1957, 1962 आणि 1967 या काळात काश्मीरमध्ये निवडणुका कशा व्हायच्या यावर बरेल लिहिले गेले आहे. 1947 रोजी सीमेपलीकडून हल्ला झाला तेव्हा प्रजा परिषदेच्या लोकांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. अशा राजकारणानंतर तुम्ही म्हणता की गेल्या साडे चार वर्षांत फुटीरतेची भावना वाढली,'' शेख अब्दुल्ला यांच्याशी झालेल्या वाटाघाटींनंतर 1989 पर्यंत काश्मीरमध्ये जे झाले त्याकाळात फुटीरतेची भावना सर्वाधिक वाढली. काश्मीरमधील लढाई फुटीरतावाद आणि दहशतवादाविरोधात आहे. तेथील स्थानिक पक्षांना दहशतवाद आणि फुटीरतावादाचा मुकाबला करण्यासाठी मतभेद असले तरी काही बाबतीत सहमत व्हावेच लागेल. तसेच आझाद हे 2010 च्या ज्याकाळाला काश्मीरचा सुवर्णकाळ म्हणत आहेत त्याच काळात काश्मीरमध्ये दगडफेक सुरू झाली, तसेच याच काळात काश्मिरी तरुणांचा हत्यारांसारखा वापर होऊ लागला, असा टोला जेटली यांनी लगावला. दरम्यान, काश्मीरबाबत श्यामाप्रसाद मुखर्जींचा दृष्टीकोन योग्य होता की जवाहरलाल नेहरुंचा याचा इतिहास जेव्हा निर्णय करेल, तेव्हा तुम्हाला त्रास होईल. आम्ही आता काश्मीरच्या भविष्याची चिंता करणे आवश्यक आहे. त्या भविष्याकडे पाहून काश्मीरमध्ये ज्या चुका झाल्या त्याच्या प्रभावातून बाहेर येऊन विकासाबाबत विचार केला पाहिजे, असेही जेटली यांनी सांगितले.
इतिहासच सांगेल, काश्मीर प्रश्नी श्यामाप्रासाद मुखर्जी योग्य होते की नेहरू - अरुण जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 4:04 PM
काश्मीर प्रश्नावरून आज राज्यसभेत काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार खडाजंगी उडाली.
ठळक मुद्देकाश्मीर प्रश्नावरून आज राज्यसभेत काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार खडाजंगीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गेल्या चार वर्षांत काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढल्याचा आरोप करत केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेअरुण जेटली यांनी सरकारच्यावतीने पलटवार करताना काश्मीर प्रश्न हा काँग्रेसकडून सातत्याने अवलंबल्या गेलेल्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे.