नवी दिल्ली: दिल्लीमध्ये प्रदुषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील वायू प्रदुषणाच्या पातळीमध्ये गेल्या तीन वर्षातील उच्चांकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे वायू प्रदुषण लवकरात लवकरत आटोक्यात आणण्यासाठी भाजपाचे नेते नंद किशोर गुर्जर यांनी भारतीय वायूदलातील विमानांच्या साहाय्याने दिल्लीमध्ये पाण्याचा मारा करण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्र लिहून करण्यात आली आहे.
नंद किशोर गुर्जर यांनी पत्रामध्ये दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, तसेच प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी वायूदलातील विमानांचा वापर करुन आकाशातून पाण्याचा मारा करण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. नंद किशोर गुर्जर गाझियाबादच्या लोणी येथील आमदार आहेत.
प्रदुषणामुळे नवी दिल्लीमध्ये रविवारी दिवसभर दाट धुके पसरले होते. त्यामुळे जवळच्या अंतरावरील दिसणेही कठीण झाले होते. या स्थितीमुळे वैमानिकांना विमानाचे उड्डाण करणे व उतरविणे अडचणीचे ठरत होते. परिणामी, दिल्ली विमानतळावर ये-जा करणाऱ्या विमानांवर परिणाम झाला होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार दिल्लीत २४ तासांतील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) रविवारी दुपारी चार वाजता ४९४ इतका म्हणजेच अतिगंभीर (सीव्हिअर प्लस) होता. या पूर्वी ६ नोव्हेंबर, २०१६ रोजी हा निर्देशांक ४९७ होता.
विजय गोयल 'ऑड' मार्गाने; सम-विषमला भाजपाचा विरोध
दिवाळीत दिल्लीत फटाके उडवण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामधून बाहेर पडणारा धूर वायू प्रदूषण वाढण्यास कारण ठरत आहे. याशिवाय, हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे. प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने आरोग्याविषयक आणीबाणी जाहीर करण्यात आल्यानंतर सोमवारपासून दिल्लीत सम-विषम वाहनांची योजना लागू करण्यात आली आहे.