नवी दिल्ली : दूषित रक्त दिले गेल्यामुळे गेल्या केवळ १७ महिन्यांत देशातील २,२३४ जणांना एचआयव्हीची बाधा झाली आहे. अशा प्रकारच्या सर्वाधिक म्हणजे ३६१ घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. रुग्णालयांतील असुरक्षित रक्त संक्रमण पद्धत याला कारणीभूत आहे. गेल्या आठवड्यातीलच आसामचे उदाहरण आहे. भाजल्यामुळे कामरूप जिल्ह्यातील तीन वर्षीय मुलाला गुवाहाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दूषित रक्त दिले गेल्यामुळे त्याला एचआयव्हीचा संसर्ग झाला. दूषित रक्तामुळे रुग्णांना एचआयव्ही होण्याच्या घटनांमध्ये गुजरात दुसऱ्या, तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही राज्यांत अशा अनुक्रमे २९२ व २७६ घटना घडल्या आहेत. राजधानी दिल्लीही यातून सुटली नाही. दिल्लीत २६४ जणांना असुरक्षित रक्ताचा फटका बसला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी अर्जानंतर राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने (नॅको) ही माहिती उघड केली. अर्थसंकल्पीय कात्रीमुळे एड्स जनजागृतीबाबत सरकारने हात आखडता घेतला आहे. दूषित रक्तामुळे एचआयव्हीचा संसर्ग होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही जबाबदार रुग्णालये आणि रक्तपेढ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असे कोठारी म्हणाले. देशभरातील सुरक्षित रक्त संक्रमणाची जबाबदारी नॅकोवर आहे. रक्तदाता व त्याच्याकडून मिळालेल्या रक्ताची चाचणी करून ते एचआयव्ही, एचबीव्ही, हेपटायटिस सी, मलेरिया वा सिफिलीस यासारख्या संसर्गजन्य रोगाने संक्रमित नसल्याची खात्री करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे. दूषित रक्तामुळे एचआयव्हीचा प्रसारगोयल म्हणाले की, दूषित रक्तामुळे एचआयव्हीची लागण होण्याच्या घटना दुर्दैवी असून, हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्ही त्या दिशेने काम करीत आहोत. आमच्या एचआयव्ही कार्यक्रमाचे प्रमाण डोळ्यासमोर ठेवून ताज्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकला गेल्यास आम्ही किती काम केले याचा प्रत्यय येईल. उदाहरणार्थ, २० वर्षांपूर्वी एकूण एचआयव्ही संसर्गाच्या आठ ते दहा टक्के संसर्ग हा रक्त संक्रमणातून होत असे. आता हे प्रमाण एक टक्क्यावर आले आहे. आम्ही रक्तातून होणाऱ्या संसर्गाला अटकाव केला आहे. गरजू रुग्णाला रक्त देण्यापूर्वी त्याची तपासणी करणे आम्ही सर्व रक्तपेढ्यांना कायद्याने बंधनकारक केले आहे. 2015 च्या नॅकोच्या वार्षिक अहवालानुसार, २०११ मध्ये भारतातील एचआयव्ही/ एड्सबाधीतांची संख्या २०.९ लाख होती. यातील ८६ टक्के रुग्ण हे १५ ते ४९ वर्षे वयोगटातील होते, तर सात टक्के रुग्ण पंधरा वर्षांहून कमी वयाची मुले होती. २०११ मध्ये एचआयव्ही/ एड्सबाधित मुलांची संख्या सुमारे १.४५ लाख, तर महिलांची संऱ्या ८.१६ लाख म्हणजेच ३९ टक्के होती.काही प्रकरणांत दाता कदाचित विंडो पिरियडमध्ये (रोगाची लागण स्पष्ट न होऊ शकण्याचा कालावधी) असू शकतो. विंडो पिरियड असताना दात्याने रक्तदान केल्यास त्याची रक्तचाचणी निगेटिव्ह (संसर्ग नाही) येते. मात्र, प्रत्यक्षात संबंधित रक्तदाता आणि त्याने दिलेले रक्त संक्रमित असते, असे गोयल म्हणाले. ताज्या वार्षिक अहवालानुसार, सप्टेंबर २०१४ पर्यंत नॅकोने एकूण ३० लाख युनिट एवढे रक्तसंकलन केले. यापैकी ८४ टक्के रक्त हे स्वयंसेवी रक्तदानातून आलेले असून येथेच खरी समस्या असल्याचे दिसते, असे नॅकोचे उपमहासंचालक नरेश गोयल यांनी सांगितले.
दूषित रक्तामुळे देशात २,२३४ जणांना एचआयव्ही; महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2016 3:54 AM