ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे अवघ्या ७ वर्षीय मुलाला शाळेतून काढल्याचा धक्कादायक प्रकार कोलकात्याजवळील बिशुपूर येथे घडला आहे. इतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दबावामुळेच शाळा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समजते.
एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेला शान हा, दिपशिखा नर्सरी या बंगाली शाळेत शिकत होता. एका एनजीओत काम करणा-या शानच्या आईने, सुजाता या स्वत: एचआयव्ही पॉझिटिव्ह असून शानलाही आजाराची लागण झाल्याचे त्यांना जानेवारी महिन्यात समजले होते. त्यानंतर त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता शाळा प्रशासनाला शान एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते. मात्र असे असतानाही आपल्या मुलाचे शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केला होता.
पण शानच्या आजाराबद्दल कळताच इतर पालकांनी त्याच्या शाळेत शिकण्याबद्दल आक्षेप नोंदवला आणि तो शाळेत राहिल्यास आपली मुले या शाळेत शिकणार नाहीत, असा पवित्रा घेतला. शाळा प्रशासन अखेर पालकांच्या दबावापुढे झुकले आणि जून महिन्यात शाळेच्या अधिका-यांनी शानच्या आईला फोन करून शानला शाळेतून काढत असल्याचा निर्णय सुनावला.