नोएडा : उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जिल्हा कारागृहात असलेल्या 26 कैद्यांचा एचआयव्ही (HIV) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात माहिती येथील एका अधिकाऱ्याने दिली. कारागृहात शिबीर उभारून केलेल्या तपासात ही बाब समोर आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
कारागृह प्रशासनाने सेक्टर-30 येथील जिल्हा रुग्णालयातील अँटी रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रात कैद्यांवर उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातील कैद्यांमध्ये एचआयव्ही पॉझिटिव्हचे प्रकरण समोर येण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बाराबंकी जिल्हा कारागृहात 22 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले होते. तर बिजनौर कारागृहातील 5 कैद्यांचा एचआयव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
एचआयव्हीचा प्रसार कसा होतो?एचआयव्ही पॉझिटिव्ह असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे होतो. तसेच, एचआयव्ही रुग्णावर वापरल्या जाणार्या सुया, सिरिंज किंवा इतर औषध इंजेक्शन उपकरणांद्वारे ते एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्ये पसरू शकते. एचआयव्ही विषाणू पीडित व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिल्याने पसरतो. एचआयव्ही बाधित गर्भवती महिलेच्या शरीरातून न जन्मलेल्या बाळाच्या शरीरातही हा विषाणू पसरू शकतो.