श्रीनगर- काश्मिरी मुलींना भारतीय सैन्यातील जवान आणि अधिकाऱ्यांपासून दूर राहा, त्यांच्याशी सोशल मीडियावर चॅटिंग करू नका, अशी धमकी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने काश्मीरमधील मुलींना दिली आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू यांनी एक ऑडिओ क्लिप जारी करून काश्मिरी मुलींना सैन्यातील जवान व अधिकाऱ्यांपासून लांब रहायला सांगितलं आहे. भारतीय सैन्याकडून काश्मिरी मुलींचा हनीट्रॅप म्हणून वापर केला जाऊ शकतो, असं रियाज नायकू याने म्हटलं आहे.
मेजर गोगोई प्रकरणानंतर हिज्बुलने ही पावलं उचलली आहेत. 10 मिनिटाच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने म्हटलं आहे की,'सैन्यातील अधिकारी व जवान काश्मिरी मुली विशेष करून शाळेतील मुलींशी संबंध बनवत असल्याची आम्हाला सूचना मिळाली आहे. दहशतवाद्यांबद्दल त्यांच्याकडून माहिती मिळविण्यासाठीची ही खेळी आहे, असं या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. लष्कराचे जवान या मुलींबरोबर संपर्क प्रस्थापित करून त्यांच्याकडून वाईट गोष्टी करून घेतील, असंही त्याने म्हटलं आहे. भारतीय सैन्याकडून मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांना हिज्बुलविरोधात वापरलं जात आहे, असा दावा त्याने केला आहे. त्याची ऑडिओ क्लिप काश्मीरमध्ये व्हायरल झाली आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, नायकू (वय 30) हा काश्मीर खोऱ्यातील सर्वात जुना दहशतवादी आहे. तो 2016 मध्ये हिज्बुलचा कमांडर बुरहान वानीबरोबर दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. 'सोशल मिडियावर लष्कर, पोलीस आणि अनोळखी व्यक्तींशी बोलू नका. त्यांना तुमची खासगी माहिती देऊ नका, अशी मी माझ्या बहिणींना विनंती करतो, असं त्याने ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मेजर गोगोई एका मुलीबरोबर हॉटेलमध्ये दिसले होते. ती मुलगी अल्पवयीन असल्याच्या संशयावरून हे प्रकरण पोलिसात गेलं. तसंच गोगोई यांची चौकशीही झाली. या प्रकरणातील मुलगी गोगोई यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आल्याचं तिने सांगितलं होतं.