श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात लष्कराकडून चालविण्यात येत असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेला सोमवारी मोठे यश मिळाले असून, सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगर याला कंठस्नान घातले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे समीर टायगर हा खोऱ्यामध्ये बुऱ्हाण वाणीप्रमाणेच दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय मानला जात होता. द्राबगाम येथे सोमवारी सकाळपासूनच लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू होता. या चकमकीमध्येच लष्कराने समीर टायगरला कंठस्नान घातले. समीरबरोबरच अकीब खान नामक अन्य दहशतवाद्यालाही लष्कराने ठार केले. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी आल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराने शोधमोहीम राबवून ही कारवाई केली. लष्कराने परिसराला घेराव घातल्यावर काही स्थानिकांकडून लष्करावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन जवान आणि एक नागरिक जखमी झाले.
सुरुवातीला करायचा दगडफेक मग बनला दहशतवादी दहशतवादी समीर अहमद भट ऊर्फ समीर टायगर याला 24 मार्च 2016 रोजी दगडफेकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची मुक्तताही करण्यात आली. पण तुरुंगातून बाहेर पडल्यावर तो कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनच्या जाळ्यात अडकला. 7 मे रोजी तो हिज्बुल मुजाहिद्दीनशी जोडला गेला. नंतर तो काश्मीर खोऱ्यामध्ये बराच प्रसिद्ध झाला होता. विशेषत: गेल्या काही महिन्यात तो काश्मिरी दहशतवादाचा नवा पोस्टर बॉय बनला होता.