West Bengal Assembly Elections 2021: बंगालमध्ये "अबकी बार 200 पार" कसा पोहोचणार भाजप? अमित शाहंनी समजून सांगितलं गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:33 PM2021-03-24T12:33:21+5:302021-03-24T12:35:35+5:30
अमित शाह यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना सांगितले, की भाजप 200 पारची घोषणा कशा पद्धतीने यशस्वी करेल. अमित शाह म्हणाले, आम्ही 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकल्या, तेव्हाही कुणाला विश्वास नव्हता. (West Bengal Assembly Elections 2021)
कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 'अबकी बार, 200 पार', अशी घोषणा दिली आहे. ओपीनियन पोल्समध्ये भाजपला अनपेक्षित यश मिळेल, असे सांगण्यात आले असले तरी, यात भाजपला 200च्या आकड्यापासून बरेच दूर ठेवले आहे. असे असताना भाजप या आकड्याच्या पुढे कसा जाईल? यावर खुद्द गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनीच भाजपचा प्लॅन शेअर केला आहे. (Amit shah told how bjp will fulfill the slogan of abki baar 200 paar in bengal)
अमित शाह यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना सांगितले, की भाजप 200 पारची घोषणा कशा पद्धतीने यशस्वी करेल. अमित शाह म्हणाले, आम्ही 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकल्या, तेव्हाही कुणाला विश्वास नव्हता. त्या जागांवर आलेल्या निकालांचे रुपांतर विधानसभेत केले, तरी आम्ही 200च्या पुढे जातो.
बंगालमध्ये 200 प्लस जागांवर भाजपचा विजय -
अमित शाह यांनी 294 विधानसभा जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आपल्या पक्षासाठी 200 प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावर बोलताना, शाह म्हणाले, आमच्या या दाव्यावर कुणालाही शंका असेल तर ते 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल पाहू शकतात. जेथे आमचे दोन खासदार वाढून 18 झाले आणि व्होट शेअर तृणमूल काँग्रेसच्या जवळपास झाले आहे.
'आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित' -
आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा अमित शाह यांना विश्वास आहे. याशिवाय तामिळनाडूतही भाजप-अन्नाद्रमूक युतीचा विजय होईल तसेच केरळ आणि पुदुचेरीमध्ये भाजपच्या जागा वाढतील. अशी आशा शाह यांनी यावेळी व्यक्त केली.
'टीएमसीचे कॅम्पेन कमकुवत' -
आपण म्हटले आहे, की पश्चिम बंगालमध्ये भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील. ते लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण काय करत आहात? असा प्रश्न विचारला असता, शाह म्हणाले, पश्चिम बंगालमधील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्याच्या विकासाचा दृष्टिकोण स्वीकारला आहे. राज्यात 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या. आप भाजपची ही कामगिरी विधानसभांशी जोडली, तर आपल्याला सहज समजेल, की आम्ही हा आकडा कसा निर्धारित केला आहे. लोकसभेत 18 जागा जिंकल्यानंतर आमचा विश्वास वाढला आहे, की भाजप निश्चितपणे जिंकू शकतो. तसेच टीएमसीच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्याने त्यांचे कॅम्पेनदेखील कमकुवत झाले आहे, असेही शाह म्हणाले.