HMPV First Case in India: २०२० मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. चीनमध्ये ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरसमुळे (HMPV) हाहाकार उडाला आहे. या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अशात चीनमधील हा व्हायरस भारतातही पोहोचला आहे. या व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आढळला आहे.
बंगळुरू येथील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV व्हायरस आढळून आला आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाने म्हटले आहे की, आम्ही आमच्या लॅबमध्ये याची चाचणी केलेली नाही. मात्र, या प्रकरणाचा अहवाल एका खासगी रुग्णालयात आला आहे. खासगी रुग्णालयाच्या या अहवालावर शंका घेण्याचे कारण नाही.
('लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, HMPV सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो. सर्व फ्लू नमुन्यांपैकी ०.७ टक्के HMPV चे असतात. तसेच, या व्हायरसचा स्ट्रेन काय आहे? हे अद्याप समजलेले नाही. अशा परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञांनी या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता आणि सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, लोकांना हात धुणे आणि मास्क वापरण्याचा आणि इतर खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हा व्हायरस नवीन नाही, घाबरू नका - डॉ. अविनाश भोंडवे HMPV व्हायरस नवीन नाही, घाबरू नका, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी नागरिकांना केले आहे. तसेच, श्वसनसंस्थेच्या या आजारात सर्दी, खोकला, ताप येतो, तो शिंका- खोकल्यातूनच पसरतो. पण कोरोना इतका तो घातक नाही. २००१ मध्येच त्याला विलग करून त्याचा अभ्यास झालेला आहे. चीन, जपान, अमेरिका, कॅनडामध्ये याचे रुग्ण पूर्वीपासून आढळत आहेत. भारतात याने बाधित रुग्ण आढळले नाहीत, असेही डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.
HMPV व्हायरस म्हणजे काय?ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो आणि हिवाळ्यामध्ये हे सर्वात सामान्य आहे.