पुणे : चीनमधील वुहान शहरातून कोरोना आजाराचा प्रसार झाला. आजाराने संपूर्ण जगात थैमान घातले असून, त्याचा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे. आजाराच्या प्रसारासाठी चीनच्या अध्यक्षांना जबाबदार धरावे. खून, खुनाचा प्रयत्न आणि लोकांच्या जीविताशी निष्काळजीपणाने वागणे याबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई करावी. त्यासाठी समिती नेमण्याची मागणी पुण्यातील अॅड. ऋषिकेश सुभेदार आणि अॅड. आशिष पाटणकर यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पत्र पाठवून केली आहे. अॅड. पाटणकर आणि अॅड. सुभेदार यांनी इंटरनॅशनल कोर्ट हेग आणि युनायटेड नेशन्सला पत्र पाठविले आहे. या कोर्टाला पाठविण्यात आलेले पत्र जनहित याचिकेत त्वरित रूपांतरित करून घेण्यात यावे, असे यात नमूद केले आहे.
कोरोना विषाणू हा जैविक दहशतवादाचा भाग असून, तो पसरवण्याचा हा चीनचा डाव होता. मात्र चीनमधील प्रयोगशाळेमध्ये करोना विषाणू लीक झाल्यामुळे त्याचा प्रसार चीनमधील वुहान शहरातून सर्वत्र झाला. जगभरातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. विषाणूमुळे जगभरातील सहा हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये अनेक घरांतील कमावते लोक होते. त्यांच्या कुटुंबीयांना याचा त्रास झाला आहे. त्यांचे आधार गेले आहेत. जगभरातील अनेक शहरांवर याचा परिणाम झाल्याचे न्यायालयाला पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.