नवी दिल्ली :काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत सध्या चर्चेत आले आहेत, पण सध्या त्यांच मुख्यमंत्रीपद अडचणीत आले आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस खांदेपालट करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे, दरम्यान, आता गहलोत गटाकडून पायलट यांना विरोध सुरू झाला आहे.
या संदर्भात आज गहलोत गटाचे कॅबिनेट मंत्री गोविंद राम मेघवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन वक्तव्य केले आहे. 'जर मुख्यमंत्री बदलले तर काँग्रेसचे सर्व आमदार आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.सचिन पाायलट यांच्यासारखा आम्हाला मुख्यमंत्रिपदी नको, सोनिया गांधी आणि राहुल गांधी आमचे नेते आहेत, असंही मेघवाल म्हणाले.
'गेहलोत आऊट, दिग्विजय सिंग इन'; मुख्यमंत्रिपदाचा निर्णय सोनिया गांधी घेणार, गेहलोत यांचं वक्तव्य
आज मुख्यमंत्री अशोक गहलोत सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत, याअगोदर त्यांनी सभापती सीपी जोशी आणि काही वरिष्ठ नेत्यांशी बैठक झाली आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अशोक गहलोत यांची माघार
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादादरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही. राजस्थानमध्ये जे काही घडलं, त्याचं मला दु:ख आहे. त्या प्रकारामुळे मला धक्का बसला आहे. त्यासाठी मी सोनिया गांधी यांची माफीही मागितली आहे, असे अशोक गहलोत यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांची भेट घेऊन आल्यानंतर अशोक गहलोत म्हणाले की, गेल्या ५० वर्षांपासून म्हणजेच इंदिरा गांधी यांच्या काळापासून मी काँग्रेसचा एक विश्वासपात्र सैनिक म्हणून काम केले आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून जी काही जबाबदारी दिली गेली, ती मी प्रामाणिकपणे निभावली आहे.
अशोक गहलोत यांनी सांगितले की, आज राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेसाठी निघाले आहेत. राहुल गांधी यांनी जेव्हा निवडणूक लढवण्यास नकार दिला, तेव्हा मी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. त्यानंतर राजस्थानमध्ये जी घटना घडली. त्या घटनेने मला धक्का दिला आहे. त्या प्रकारामुळे मी मुख्यमंत्रिपदावर कायम राहू इच्छितो, असा संदेश संपूर्ण देशामध्ये गेला. मी या प्रकारासाठी सोनिया गांधी यांची माफी मागितली आहे. मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे. झाल्या प्रकारामुळे खूप दु:खी आणि व्यथित झालो आहे. त्यामुळे मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच माझ्या मुख्यमंत्रिपदाबाबत सोनिया गांधी निर्णय घेतील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"