CM Siddaramaiah : महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. मात्र या गांधी जयंतीच्या कार्यक्रमादरम्यान कर्नाटकातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पायातील बूट काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. इतपर्यंत ठीक होते. मात्र बूट काढणाऱ्या कार्यकर्त्याच्या हातात तिरंगा असल्याने हे प्रकरण आणखी तापले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या गेल्या अनेक दिवसांपासून वादात आहेत. मुडा प्रकरणात ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातच ते अडकलेले असतानाच आता आणखी एक नवा वाद समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसचा एक कार्यकर्ता हातात तिरंगा धरून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पायातील बूट काढत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकारणही तापले आहे. काँग्रेसला देशाचा आदर नाही आणि राष्ट्रध्वजाचाही आदर नाही, असे भाजपने म्हटले आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेस पक्षाने बंगळुरूमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. यादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या एका बुटाची लेस सैल झाली. मुख्यमंत्र्यांच्या बुटाची लेस उघडलेले पाहून काँग्रेसचा एक कार्यकर्ता लगेच खाली वाकला आणि लेस बांधू लागला. मात्र यावेळी हातात तिरंगा असल्याचे काँग्रेसचा कार्यकर्ता आणि तिथे उपस्थित असलेले लोकही विसरले. काँग्रेस कार्यकर्त्यांने तसाच हातात तिरंगा धरुन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बुटाची फीत बांधण्यास सुरुवात केली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बुटाची लेस बांधली जात असताना काँग्रेसचे इतर अनेक कार्यकर्तेही तिथे उपस्थित होते. मात्र, काही वेळाने त्या कार्यकर्त्याच्या हातात तिरंगा असल्याचे लोकांच्या लक्षात आहे. त्यानंतर एका कार्यकर्त्याने बूट बांधणाऱ्या व्यक्तीकडून तिरंगा काढून घेतला. हा सगळा प्रकार सुरु असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही त्या व्यक्तीला थांबवले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कर्नाटक भाजपने या सगळ्या प्रकारावरुन काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सिद्धरामय्या हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. त्यांना आपली खुर्ची टिकवण्याची चिंता लागली असतानाच राष्ट्रध्वज हातात घेऊन ते मंत्रमुग्ध झाले आहेत, अशी टीका भाजपने केली आहे.