नवी दिल्ली - देशभरात रंगपंचमी जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी होळी सण साजरा करण्याची परंपरा आहे. वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन करण्याच्या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला देशभरात होळीचा सण साजरा होतो. होळी सणासोबत कित्येक प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण पौराणिक कथादेखील जोडल्या गेलेल्या आहेत.
या विशेष प्रसंगी जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन गुगलनंदेखील आपल्या होमपेजवर होळी सणाचे डुडल साकारत शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलच्या डु़डलवर बरेच जण रंगपंचमी खेळताना पाहायला मिळत आहेत. कोणाच्या हातात पिचकारी आहे, तर कोणी बादलीमध्ये रंग भरुन, या रंगांची उधळण करत आहेत. कोणी ढोल-ताशांचा गजर करत जल्लोष साजरा करत आहेत. आणखी विशेष बाब म्हणजे गुगलनं होळी सणानिमित्तचं हे डुडल सोशल मीडिया वेबसाइट्वर शेअर करण्यासाठी पर्यायदेखील दिला आहे.
होळीचा जल्लोष
दरम्यान, रंगपंचमीच्या आदल्या दिवशी होळी सण देशभरात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. यानिमित्त सायंकाळी घरासमोर व चौकाचौकात होळी पेटवून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. सोबत समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करण्यात आली. होळी सणापासून विविध सणांना प्रारंभ होतो. होळीनंतर धुळवड, रंगपंचमी, गुढीपाडवा असे सण साजरे करण्यात येतात.