पेइचिंग: कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाचा फटका जगातल्या 80 देशांना बसला आहे. आतापर्यंत तीन हजारहून अधिक जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. कोरोनाच्या रचनेची नेमकी माहिती नसल्यानं त्यावर उपचार करणं कठीण जात आहे. भारतातदेखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये 2 संशयित असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर, तेथील प्राथमिक शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.
ओडिशा येथे कोरोना व्हायरस संशयीत महिला रुग्णालयातून पसार झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे, भारतताही कोरोनाचा गंभीरतेबाबत सर्वजण जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. भारतात रुग्णांचा आकडा 30 असून कोरोनाचा भारतीयांना संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अफवांमुळे लोक धास्तावून गेले आहेत. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक शाळांना 31 मार्चपर्यंत सुटी देण्यात आली आहे. दिल्लीत व देशाच्या अन्य भागांतही होळीसह जवळपास सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले आहेत.
दिल्लीनंतर आता, जम्मू आणि काश्मीरमधील प्रशासनानेही 31 मार्चपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, राज्यातील बायोमेट्रीक पद्धतीने होणारी हजेरी (अटेंडंट) बंद करण्यात आली आहे. नोंदणी बुकात नोंद करुन पुन्हा जुन्या पद्धतीने हजेरी सुरू करण्यात आली आहे, राज्याचे प्रमुख सचिव रोहित कंसल यांनी याबाबत माहिती दिली.