नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्ती सुंदर घर बांधण्याचे स्वप्न पाहते आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडते. ब्रिटनमधील ३७ वर्षीय अँजेलो मास्ट्रोपिएट्रो यांनी ८ महिने खपून एका ८00 वर्षे जुन्या गुहेला घरात रूपांतरित केले आहे. ब्रिटनमधील वोर्केस्टरशायरमधील वायरे जंगलात ही गुहा आहे. अँजेलो यांचे या गुहेत योगायोगाने आगमन झाले. अँजेलो हे एका वादळात सापडले होते. त्यांनी त्यातून वाचण्यासाठी या गुहेत आश्रय घेतला. ती त्यांना इतकी आवडली की, त्यांनी ही गुहा खरेदी केली. सलग आठ महिने स्वत: मेहनत करून त्यांनी गुहेचा पाषाण फोडून तिला नीट आकार दिला. या काळात एकूण १ हजार तास त्यांनी काम केले. ८0 टन मलबा त्यांनी बाहेर काढला.या घरासाठी रस्ता बनवायला त्यांना ११ दिवस लागले. या अनोख्या घरात अँजेलो यांनी सर्व आधुनिक सुखसोयी निर्माण केल्या आहेत. पाणी, काचेचे दरवाजे-खिडक्या, वायफाय, भूमिगत हिटिंग यंत्रणा, निमणी, फायर प्लेस येथे आहे. नैसर्गिक सौंदर्य टिकावे यासाठी त्यांनी सिंक आणि वॉश बेसिनसाठी लाकडाचा वापर केला. या गुहेला त्यांनी नैसर्गिक साधनांचा वापर करून सजविले आहे. आता अँजेलो यांनी हे घर पैसे कमावण्याचे साधन म्हणून वापरायला सुरुवात केली आहे. या घरात एक दिवस मुक्काम करण्यासाठी २८८ डॉलर ते आकारतात. विशेष म्हणजे हे घर पाहायला दूरदुरून लोक येऊ लागले आहेत.
गुहेलाच बनविले घर
By admin | Published: March 06, 2017 4:47 AM