नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी काँग्रेसवर निषाणा साधला. विरोधी पक्ष कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून क्षुद्र राजकारण करत आहे. त्यांनी जनतेच्या मनात भ्रम निर्माण करण्यापेक्षा देशाच्या हिताचा विचार करायला हवा, असे शाह यांनी म्हटले आहे.
काँग्रेसाध्यक्षसोनिया गांधी यांनी नुकताच, सरकारवर लॉकडाऊन करण्यापूर्वी कुठल्याही प्रकारचे नियोजन केले नव्हते, यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला, असा आरोप केला होता. हाच धागा पकडत शाह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. शाह यांनी ट्वट करून केला आरोप -यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वात कोरोना व्हायरसविरोधातील लढ्याचे देश आणि जागतीक पातळीवर कौतुक होत आहे. 130 कोटी भारतीय कोरोनावर मात करण्यासाठी एकत्र आले आहेत. असे असतानाही, काँग्रेस क्षुद्र राजकारण करत आहे. त्यांनी देश हिताचा विचार करावा आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करणे सोडावे.'
पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद -देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत चर्चा केली. तसेच पंतप्रधानांनी यावेळी काही सल्लेही दिले.
यावेळी मोदींनी देशातील लॉकडाऊनच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली. राज्यांनी जनतेकडून लॉकडाऊनची कठोरपणे पालन करून घ्या, अशी सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही याची काळजी राज्यांनी घ्यावी. तसेच ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, अशा व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवावे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटईन करावे. क्वारंटाईन वॉर्ड वाढवावे लागले तर वाढवावेत, अशा सूचना यावेळी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.