नवी दिल्ली : कोरोनावर मात करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घरी गेल्यानंतर रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. यामुळे पुन्हा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती सुधरली असून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे एम्स रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.
17 ऑगस्टला रात्री अमित शहांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. यामुळे त्यांना रात्रीच एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. 2 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर 14 ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यात आले होते.
आज एम्सने बुलेटीन काढत अमित शहा ठणठणीत बरे झाले असून त्यांच्यावर कोरोनापश्चात उपचार सुरु होते. त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी त्यांनी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं ट्विट केलं.ते म्हणाले,'' माझी कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. मी देवाचे आभार मानतो आणि माझ्या प्रकृतीसाठी ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली व माझ्या कुटुंबीयांना धीर दिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आणखी काही दिवस मी होम आयसोलेशन मध्ये राहणार आहे.'' त्यांनी पुढे म्हटले की,''कोरोनाशी मुकाबला करण्याकरीता मला मदत करणाऱ्या आणि माझ्यावर उपचार करणाऱ्या मेदांता हॉस्पिटलातील सर्व डॉक्टर्स व स्टाफचेही आभार.''