बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यातील शाब्दिक सामना पाहायला मिळाला. राऊत यांनी बुधवारी राज्यसभेत 'द क्रिमिनल प्रोसिजर (आयडेंटिफिकेशन) बिल २०२२' यावर बोलताना मोदी सरकारवर हल्लाबोल केला. "या कायद्याचा गैरवापर होणार नाही किंवा होत नाहीये हे तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकता का?" असा सवाल अमित शाहंना केला. यावर अमित शाहंनीदेखील आपल्या शैलीत उत्तर दिलं.
"तुम्ही डोळ्यात डोळे घालून उत्तर देऊ शकता का असं एका सदस्यानं विचारलं. जर कोणी डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत ठेवत असेल तर मीदेखील उत्तर देऊ शकतो. फोरम वर देऊ शकतो कारण माझ्या मनात चोर नाही. आमची आत्मा जे सांगते तेच आम्ही करतो," असं अमित शाह म्हणाले.
'द क्रिमिनल प्रोसिजर (आयडेंटिफिकेशन) बिल २०२२' या विधेयकाला लोकसभेत यापूर्वी मंजुरी मिळाली आहे. या विधेयकावर बुधवारी राज्यसभेत चर्चा करण्यात आली. गुन्ह्यांचं प्रमाण कमी करावं आणि शिक्षेचं प्रमाण वाढवावं, देशाची कायदा व्यवस्था अधिक बळकट करणं आणि अंतर्गत सुरक्षेला अधिक चांगलं करणं हा या विधेयकामागील उद्देश असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच सर्व डेटा एनसीआरबीकडे येईल आणि एनसीआरबीकडेच सुरक्षित प्लॅटफॉर्मवर, तसंच हार्डवेअरमध्ये राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.