Home Minister Amit Shah spoke to Chief Ministers to get their views on Coronavirus Lockdown rkpनवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लॉकडाऊन-4 च्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत काल (दि.28) बैठक घेतली. या बैठकीत अमित शाह यांनी लॉकडाऊन-4 च्या राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली.
अमित शाह यांनी लॉकडाऊन वाढविण्याबाबत सर्व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. देशात 31 मे नंतर लॉकडाऊन वाढवलं तर त्याच्या गाईडलाईन्स काय असाव्यात, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, लॉकडाउन -4 चा कालावधी 31 मे रोजी संपणार आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता पुन्हा लॉकडाउन-5 देशात लागू होईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, ठाणे, इंदौर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सुरत आणि कोलकाता या 11 शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये लॉकडाऊन शिथिलताची शक्यता कमी आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा लॉकडाऊन-5 लागू केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशात लॉकडाऊन वाढविला जाणार की नाही, यावर स्पष्टीकरण देतील, असेही म्हटले जात आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात, केंद्राकडून धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते, मात्र, यासाठी नियम व अटी लागू असतील. तसेच, लॉकडाऊन-5 मध्ये कंटेनमेंट झोन वगळता सलून आणि जिम सर्व झोनमध्ये उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते.