अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 02:49 PM2024-09-29T14:49:41+5:302024-09-29T14:50:31+5:30
गुरुग्राममधील बादशाहपूर विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेला संबोधित करताना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला...
हरियाणा विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आता केवळ एक आठवडाच शिल्लक आहे. अशात सर्वच राजकीय पक्षाचे बडे नेते संपूर्ण ताकदीनिशी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. यातच गुरुग्राममधील बादशाहपूर विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेला संबोधित करताना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे.
शाह म्हणाले, "इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी... काँग्रेस पक्षाच्या तीन पिढ्यांनी लष्कराचा सन्मान केला नाही. वन रँक-वन पेन्शनची मागणी पूर्ण केली नाही. आपण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले आणि त्यांनी वन रँक वन पेन्शनची मागणी पूर्ण केली. पीएम मोदींनी वन रँक-वन पेन्शनचं तिसरं व्हर्जनही लागू केली आहे, आता नवीन पगारासह पेन्शन मिळेल"
अयोध्येतील जागा गमावल्यासंदर्भात काय म्हणाले अमित शहा? -
लोकसभा निवडणुकीत अयोध्येच्या जागेवर भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. यासंदर्भात बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "जागांवर जय-पराजय होतच असेत. त्याचा संबंध रामलल्लाच्या अपमानाशी जोडू नका. काँग्रेस पक्षाच्या राजवटीत रामलला तंबूत होते. पंतप्रधान मोदींनी भूमिपूजनही केले, मंदिरही बांधले आणि प्राणप्रतिष्ठाही पार पाडली.'' तत्पूर्वी, अयोध्येत भाजपचा पराभव झाला कारण त्यांनी रामलल्लाचा अपमान केला, असे विरोधक म्हणत होते.
अग्निवीर योजनेवरून काँग्रेसवर निशाणा -
अमित शहा यांनी अग्निवीर योजनेसंदर्भातही काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. शाह म्हणाले, "अग्नीवीर योजना केवळ तरुणांना सैनिक बनवण्यासाठी आहे. हरियाणातील प्रत्येक अग्निवीराला राज्य सरकार आणि भारत सरकार पेन्शन असलेली नोकरी दिणार. पाच वर्षांनंतर असा एकही अग्निवीर नसेल ज्याच्याकडे पेन्शन असलेली नोकरी नसेल." यावेळी शाह यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामाचा पाढाही वाचला.