- एस. पी. सिन्हा
नवी दिल्ली : देशाच्या अंतर्गत सुरक्षेसह व्हिजन २०४७ निश्चित करण्यासाठी हरियाणातील सूरजकुंड येथे प्रथमच देशभरातील विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांचे दोन दिवसीय चिंतन शिबिर २७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणारे शिबिर सहा सत्रात चालणार आहे.
अंतर्गत सुरक्षेसह जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी रणनीती ठरविण्यावर त्यात भर दिला जाईल. विविध राज्यांचे गृह सचिव, पोलीस महासंचालक, सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस दलांचे महासंचालक या शिबिराला उपस्थित राहतील. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडेच गृहखात्याची जबाबदारी असून ते सुद्धा उपस्थित राहतील. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः उपस्थित न राहता त्यांचा प्रतिनिधी पाठवतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील.