नवी दिल्ली : लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Lok Sabha) यांनी बुधवारी विरोधकांच्या अविश्वास ठरावाविरोधात भाषण केले. यावेळी अमित शाह यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच, भाषणादरम्यान सतत अडवणूक करणारे काँग्रेस नेते अधीर रंजन यांनाही अमित शाह यांनी सोडले नाही. दरम्यान, अमित शाह काश्मीर मुद्द्यावर बोलत असताना अधीर रंजन यांनी जोरदार भाषणबाजी सुरू केली. यावर अमित शाह म्हणाले की, "काँग्रेसने अधीरजींना वेळ दिला नाही, त्यांना भाजपच्या वेळेतील अर्धा तास द्या. त्यांच्या पक्षाने त्यांना वेळ दिला नाही म्हणून ते मध्येच बोलतात. आमचे संसदीय कामकाज मंत्रीही माझ्या या विनंतीला विरोध करणार नाहीत."
विरोधी पक्षांचा मोदींवर विश्वास नसेल, पण देशातील जनता मोदींसोबत आहे, असे अमित शाह म्हणाले. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात विरोधी पक्षांचे नेते म्हणाले होते की, ही मोदींची लस आहे, घेऊ नका; पण जनतेने पीएम मोदींवर विश्वास दाखवला आणि सर्व डोस पूर्ण केले. विरोधकांनीही लॉकडाऊनला विरोध करत गरीब काय खाणार असा सवाल केला होता. सरकारने लॉकडाऊन लागू केला तेव्हा एकही गरीब उपाशी राहिला नाही. ८० कोटी लोकांना मोफत गहू दिला, असे अमित शाह म्हणाले.
याचबरोबर, अमित शाह यांनी लोकसभेत मणिपूर हिंसाचाराची संपूर्ण माहिती दिली. यावेळी अमित शहा यांनी विरोधकांना घेरले आणि म्हटले की, मणिपूरमध्ये घडलेली घटना लज्जास्पद आहे, मात्र त्यावर राजकारण करणे त्याहूनही लज्जास्पद आहे. तसेच, देशात गैरसमज पसरवला गेला आहे की या सरकारला मणिपूरवर चर्चा करायची नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून चर्चा करण्यास तयार होतो. तुम्ही चर्चा करायलाही तयार नव्हते. गदारोळ करून तुम्ही आम्हाला गप्प कराल असे तुम्हाला वाटते. आपण ते करू शकत नाही. या देशातील १३० कोटी जनतेने आपल्याला निवडून दिले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवलं नाही? ४ मेच्या व्हिडिओवर अमित शाह म्हणाले की, तो व्हिडिओ संसदेच्या अधिवेशनाच्या एक दिवस आधी का आला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर का टाकण्यात आला. तो पोलिसांना का दिला नाही? मी मणिपूरच्या जनतेला आवाहन करतो की हिंसा हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. याचबरोबर, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना न हटवल्याबद्दल अमित शहा म्हणाले की, राज्य सरकार सहकार्य करत नाही तेव्हा कलम ३५६ लागू केले जाते. आम्ही डीजीपीला हटवले. त्यांनी केंद्राचा निर्णय मान्य केला. मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांना काढून टाकले जाते, पण मणिपूरचे मुख्यमंत्री सहकार्य करत आहेत, असे अमित शाह म्हणाले.