श्रीनगर : काश्मीरचा प्रश्न सर्वांनी मिळून सोडवायचा असल्यानेच आम्ही इथे आलो. समाजातील वेगवेगळ्या गटांना आणि व्यक्तींना भेटलो. पण फुटीरवादी मंडळी भेटायला आली नाहीत, इतकेच नव्हे, तर आमच्या शिष्टमंडळातील जे सदस्य त्यांना भेटण्यासाठी गेले, त्यांच्याशीही चर्चा करण्याचे फुटीरवादी मंडळींनी टाळले. त्यांचा काश्मिरियत, इन्सानियत आणि जमुरियतवर (लोकशाही) विश्वास नाही, हेच यातून स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सोमवारी फुटीरवाद्यांवर जोरदार हल्ला चढवला.काश्मीरमधील सामान्य जनता या फुटीरवाद्यांना कंटाळली आहे. ती भीतीपोटी गप्प आहे. आम्ही काश्मीरमधील प्रत्येकाशी बोलायला तयार आहोत. पण या प्रश्नावर पाकिस्तानशी अजिबात चर्चा होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. माकपचे नेते सीताराम येचुरी, भाकपचे नेते डी. राजा, जद (यू) चे नेते शरद यादव , राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश यादव आणि एमआयएमचे असाउद्दिन ओवेसी स्वत:हून फुटीरवाद्यांचे म्हणणे ऐकायला गेले होते. त्यांना जा अथवा नका जाऊ, असे आपण काहीही सांगितले नव्हते. पण स्वत:हून चर्चेसाठी आलेल्या नेत्यांना न भेटणे याला माणुसकी वा लोकशाही म्हणत नाहीत. काश्मिरी पाहुणचाराच्या विरोधात हे फुटीरवादी वागले आहेत, असेही ते म्हणाले.फुटीरवाद्यांशी चर्चा करण्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या भूमिकेबद्दल भाजपाची भूमिका विचारता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून प्रत्येकाशी बोलायला आम्ही तयार आहोत, एवढेच उत्तर त्यांनी दिले. काश्मीर हा भारताचा भाग आहे व राहील, येथील जनतेलाही भारतातच राहायचे आहे, असे सांगतानाच, येथील परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी खात्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली. हे शिष्टमंडळ आज श्रीनगरहून जम्मूला रवाना झाले. (वृत्तसंस्था)>काश्मीरमध्ये केवळ पीडीपीचे सरकार असावे असा एक प्रस्ताव आणि काश्मीरला भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून अधिक स्वायत्तता मिळावी, असा नॅशनल कॉन्फरन्सचा प्रस्ताव आला आहे. त्याबाबत विचार करण्याचे त्यांनी सूचित केले.>‘पावा’मुळे जीव जाणार नाहीपेलेट गन्सला खूप विरोध होत होता. त्यामुळे आम्ही त्याऐवजी पावा शेल्सचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जीवितहानी होणार नाही, असा दावा त्यांनी केला.>खोऱ्याचा भाग केंद्रशासित करा : हिंदू पंडितजम्मूमध्ये हॉटेल व्यावसायिक, पर्यटन संस्थांचे चालक, टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रतिनिधी, जम्मू-काश्मीर बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि खोऱ्यातील अशांततेमुळे व्यवसायावर विपरित परिणाम होत असल्याची कैफियत मांडली. पनुन कश्मीर या काश्मिरी पंडितांच्या संघटनेने आम्ही काश्मीर खोऱ्यात जाण्यास तयार आहोत. मात्र तो भाग केंद्रशासित करावा, अशी मागणी केली आहे. मात्र त्यांचे प्रतिनिधी या शिष्टमंडळाला भेटायला गेले नाहीत.
गृहमंत्र्यांचा काश्मिरी फुटीरवाद्यांवर हल्लाबोल
By admin | Published: September 06, 2016 4:42 AM