मुंबई - केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. त्यातूनच,आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसून येतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्लीतील हिंसाचारामागे भारतीय जनता पक्षाचा (भाजप) हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर, आता काँग्रेसनेही दिल्लीतील आंदोलनाची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांचीच असल्याचं म्हटलंय. तसेच, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केलीय.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. तसेच ठिकठिकाणी शेतकरी आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. दिवसभर झालेल्या हिंसाचारात सुमारे ३०० हून अधिक पोलीस जखमी झाले. दरम्यान, आज सिंघू बॉर्डरवर शेतकरी नेते जमा झाले. तसेच त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करून शांततेत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हिंसाराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांचा आरोप
लाल किल्ल्याच्या दिशेने ट्रॅक्टर रॅली गेली. पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला. भाजपशी संबंधित दीप सिद्धूने तिथे ध्वज फडकवण्याचे काम केले. याच दीप सिद्धूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. दिल्लीत उसळलेला हिंसाचार हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना केला.
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
दिल्लीतील हिंसाचाराबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली झालेल्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. हिंसाचार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याशिवाय, दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील एक प्रकारे समर्थन करत आहेत, असा आरोप सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
शेतकरी नेत्यांचा आरोप
शेतकरी नेते आणि स्वराज अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव, भारतीय किसान युनियनचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह यांनी अभिनेता दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. मात्र, दीप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारात तब्बल ३०० पोलीस जखमी झाले असून, या प्रकरणी २०० जणांना अटक करण्यात आली आहे.
अतुल भातखळकर यांचा आरोप
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचं कनेक्शन हे मुंबईतील आझाद मैदानातील अबू आझमींच्या भाषणाशी आहे का? याची चौकशी करा, अशी मागणी करणारं पत्र भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलं आहे. भातखळकर यांच्या पत्रानं आता दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईतही राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. "घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे. मोदीजी तुम खतम हो जाओगे", अशी वक्तव्य आझमी यांनी मुंबईतील भाषणात केल्याचं भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे. अबू आझमी यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली असून त्यामागचा बोलवता धनी कोण हे शोधायला हवं, असं आवाहन भातखळकर यांनी केलं आहे.