नवी दिल्ली : पश्चिम बंगाल (West bengal Assembly Election 2021) आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या (Assam Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपा विजयी होईल, असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. (home minister shri amit shah press conference west bengal assam assembly election)
पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये ३० जागांपैकी २६ पेक्षा जास्त जागांवर विजय होईल, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. "काल (दि.२७) आसाम आणि बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झाले. मी भाजपाकडून पार्टीचे अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी दोन्ही राज्यातील जनतेला धन्यवाद देतो", असे रविवारी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत अमित शाह म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये ८४ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान आण आसामध्ये ७९ टक्क्यांहून जास्त मतदान झाले आहे. त्यामुळे येथील जनता उत्साहित आहे. आसाममधली काही वर्षांपूर्वी आणि पश्चिम बंगालची याआधीची निवडणूक हिंसाचारासाठी ओळखली जात होती. मात्र, यंदा दोन्ही राज्यात शांततेत मतदान झाले. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी नाही. हे दोन्ही राज्यांसाठी शुभ संकेत आहेत, असे अमित शाह म्हणाले.
याचबरोबर, पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये ३० जागांपैकी २६ पेक्षा जास्त जागांवर भाजपाचा विजय होईल. या जागांवर बहुमताने विजय होईल. आमच्या जागा सुद्धा वाढत आहेत आणि विजयाचे अंतर सुद्धा वाढत आहे. आसामध्ये ४७ पैकी ३७ जागांपेक्षा जास्त भाजपाचा जिंकेल, यासंबधी स्पष्ट संकेत दिसत आहेत, असे अमित शाह म्हणाले.
ममतांच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळपश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांच्या कथित ऑडियो क्लिपमुळे खळबळ माजली आहे. नंदीग्राम येथे ममता यांच्याविरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय असलेले प्रलय पाल यांना ममता यांनी फोन लावला व जिंकण्यास मदत करण्यासाठी मदत मागितल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.