पंजाबमध्ये आधीच सुरू असलेल्या राजकीय गोंधळामध्ये आता बीएसएफचे कार्यक्षेत्रावरुन पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाने बुधवारी तीन राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र वाढवले, यामध्ये पंजाबचाही समावेश आहे. पण, यावर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पण, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. यावर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, 'काश्मीरमध्ये दररोज भारतीय सैनिक मारले जात आहेत. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांकडून पंजाबमध्येही शस्त्रे आणि अंमली पदार्थ पाठवण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवल्यामुळे या सर्व गोष्टींवर आळा बसू शकतो. केंद्रीय सशस्त्र दलांना राजकारणात ओढू नये', असं ते म्हणाले.
अमरिंदर सिंग पुढे म्हणाले, 'राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत पक्षपाती विचार कुणी करू नये. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी मी तेच बोललो होतो आणि आजही सांगतो आहे. जेव्हा देशाची सुरक्षा धोक्यात येते, तेव्हा राजकारणाच्या वर विचार करायला हवा. आज पुन्हा एकदा देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे.'
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा विरोधपंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी ट्वीट करुन केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. 'आंतरराष्ट्रीय सीमेवर 50 किमी आतपर्यंत बीएसएफला अतिरिक्त अधिकार देण्याच्या भारत सरकारच्या एकतर्फी निर्णयाचा मी तीव्र निषेध करतो. हा राज्यायवर केलेला थेट हल्ला आहे. मी गृहमंत्री अमित शहा यांना हा निर्णय त्वरित मागे घेण्याची विनंती करतो,'असं चन्नी म्हणाले.